अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या

0
13
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी
नांदेड : दि.19–गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचा जमिनी खरडून गेल्या आहेत.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करतांना शेतातील पिके व शेतजमिन यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून बाधितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोन दिवसापासून चालू मुसळधार पावसामूळे माहूर,कीनवट, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावाचे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतक-यांचे अन्नधान्य, रासायनिक खते, शालेय विद्यार्थ्याची पुस्तके,भांडे,कपडे व इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहे.घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. याकडे मात्र अद्यापही प्रशासनाने फिरकुनही पाहिले नाही.नुकसानग्रस्त भागाची त्वरीत पाहणी करून तात्काळ पंचनामा करून शेतक-यांना तात्काळ मदत किमान हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. पुरामुळे नदीकाढच्या गावात सर्वत्र चिखल पसरला असल्याने पिण्याचे पाणी दुषीत झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती आहे.यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण करावे,शेतजमीन व पिकांचे स्वतंत्र सर्वेक्षण संयुक्त समिती मार्फत करावे.जमीन खरडून गेल्याने शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रशासनाने सर्वेक्षनाचे काम त्वरीत सुरू करून शेतकरी व बेघर झालेल्या ग्रामस्थांना आधार द्यावा अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.यावेळी विनीत पाटील हरडफकर,प्रशांत पाटील आबादार,रामदास पाटील,संदीप पावडे,शिवशंकर थोटे,श्रीकांत शिंदे, परमेश्वर काळे,सुनील पाटील,अरविंद पाटील कदम,शंकर राऊत, अमोल शिंदे,पंकज टनमने,दिनेश जाधव,कुलभूषण ठाकरे,आदित्य पाटील,यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.