रानडुकराच्या शिकार प्रकरणी दोघांना अटक

0
8

गडचिरोली ,दि.27ः-चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निपंधरा जंगला परिसरात रानडुकाराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोलीकडे दुचाकीने आणत असलेल्या दोन आरोपी गडचिरोलीच्या वनाधिकार्‍यांनी सकाळी १0 वाजताच्या सुमारास अटक केली. प्रशांत वासुदेव भैसारे (२७), सदाशिव जनार्धन वेलादे (४५) दोघेही रा. आंबेशिवणी ता. आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निपंधरा येथील जंगलात रानडुकाराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोलीकडे दुचाकीने घेऊन येत असल्याची माहिती वनाधिकार्‍यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वनाधिकारी व वनकर्मचार्‍यांनी सापळा रचला असता एक दुचाकी संशयास्पद आढळून आल्याने सदर दुचाकीला थांबवून चौकशी केली असता आरोपीकडे अंदाजे ७ किलो रानडुकराचे मांस आढळून आले. वनाधिकारी मांस व वाहतुकीस वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली.
सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. कैलुके, वनरक्षक बि.पी. राठोड, आर.के. चव्हाण, के. डी. मुनघाटे, के. बी. कवडो, डी. एस. धुर्वे व वनकर्मचार्‍यांनी करून सदर प्रकरण पुढील चौकशीकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी सावली व पाथरीचे क्षेत्र सहाय्यक आर. एस. ताबरे यांना हस्तांतरीत केले.