पूरग्रस्त केरळ मदत निधीत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे 25000 रु. चा धनादेश सुपूर्द

0
9

चंद्रपूर,दि.28ः- नुकतेच केरळ राज्यात महापुराने थैमान घातले. यात निसर्ग संपन्न केरळ राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्ता हानी झाली. देशभरातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. आपत्तीसमयी नेहमी मदतीची भूमिका घेणा-या चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने या संकटकाळी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलला आहे. आज मुख्यमंत्री केरळ मदत निधीत 25,000 रु. ची मदत धनादेशाच्या स्वरूपात करण्यात आली. हा धनादेश श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सुपूर्द केला. याप्रसंगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांची उपस्थिती होती. श्रमिक पत्रकार संघाच्या या मदतनिधीत सभासदांनी वैयक्तिक दिलेली राशी आणि संघातर्फे दिली जाणारी मदत यांचा समावेश आहे. धनादेश सुपूर्द करतेवेळी श्रमिक पत्रकार संघाचे जितेंद्र मशारकर, मजहर अली, देवानंद साखरकर, राजेश निचकोल यांची उपस्थिती होती. या मदतीविषयी समाधान व्यक्त करताना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या पुढाकाराचे कौतुक केले. आपद्ग्रस्त केरळ राज्यातील जनतेला चंद्रपूर जिल्ह्यातून मदत केली जात आहे. ही कृती इतरांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातून केरळ मदत निधीत अचूक मदत जावी यासाठी आपण नाव -खाते क्रमांक जारी करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.