नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली

0
9

लाखनी,दि.29 : तालुक्यातील मेंढा/सोमलवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी गवत आणण्यासाठी सोनेखारी नाल्यापलीकडील शेताकडे बैलगाडीने जात असताना पुरामुळे बैलगाडी वाहून गेल्याने २ बैल मृत्युमुखी पडले. ही घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली. दैव बलवत्तर म्हणून शेतकरी बचावला असला तरी ७० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे.मुलचंद दाजीबा धुर्वे (६०) मेंढा/सोमलवाडा यांच्याकडे सोनेखारी तालुका लाखनी येथे अंदाजे ४ एकर शेतजमीन आहे. नाल्यापलीकडे असल्याने नाल्यातून जाणे येणे करावे लागते. ते शेतीबरोबरच पशू पालनाचाही व्यवसाय करतात. त्यांच्याकडे ३ बैल, २ गायी व बऱ्याच शेळ्या आहेत. मागील २ दिवसांपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु असल्याने नदी नाल्यांच्या जलस्तरात वाढ झाली आहे. .

नेहमीप्रमाणे मुलचंद धुर्वे बैलगाडीने जात असताना अचानक नाल्यात बैलगाडी वाहून जाऊ लागली. त्यांनी आरडाओरड केली पण काही उपयोग झाला नाही. सरतेशेवटी पुरात उडी घेऊन कसाबसा किनारा गाठून स्वत:चा जीव वाचविण्यात यशस्वी झाले असले तरी बैलजोडी मात्र पाण्यात बुडून मृत्युमुखी झाली. गावकऱ्यांना घटना समजताच घटनेची माहिती तालुका प्रशासनास देण्यात आली. गडेगावचे तलाठी राहुल चौरे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. ७० हजार रुपये नुकसानीचा तालुका प्रशासनास अहवाल सादर केला.अत्याधिक पाण्याचा प्रवाह असल्यामुळे मृत बैलांना पाण्याबाहेर काढता आले नसले तरी वृत्त लिहीपर्यंत पशुधन विकास अधिकारी डॉ.राठोड घटनास्थळावरच होते. या घटनेची दुपारी ४ वाजतापर्यंत लाखनी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे स्टेशन डायरी अंमलदाराने सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पं.स.सदस्य घनश्याम देशमुख यांनी केली आहे..