राष्ट्रीय लोक अदालतीचे ९ सप्टेंबर रोजी आयोजन

0
11

वाशिम, दि. २९ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

            दाखलपुर्व प्रकरणे जसे धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे तर न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे इतर दिवाणी प्रकरणे या संवर्गातील प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. लोक अदालतीमध्ये जी प्रकाराने निकाली निघतील त्यातील पक्षकारांना अनेक फायदे होतात. लोक अदालतीच्या निवाड्याविरुध्द अपील करता येत नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने दोन्ही पक्षांना समाधान देतो. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. तसेच लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. ज्या पक्षकारांची वरील संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अथवा न्यायालयात दाखल व्हायची आहेत अशी (दाखलपूर्व) प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.