डॉ. किसन महाराज साखरेंना ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार

0
18

मुंबई,दि.30 – राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी  तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.किसन महाराज साखरे यांना येत्या ३१ ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील पद्मावती चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृह येथे संध्याकाळी ६.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. गतवर्षीचे या पुरस्काराचे मानकरी ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.

हा पुरस्कार यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. उषा देशमुख आणि ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाड़मयावर अध्यापन करत असून गेली ५७ वर्षापासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड़मयावर लेखन करीत आहेत. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे. आकाशवाणीवर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेदेखील कार्य केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा, सो्‌हम योग, योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी १०० हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे.