आज जि.प.चा घेराव करून शिक्षक रोष व्यक्त करणार

0
7

गोंदिया,दि.31ः-शैक्षणिक सत्र २0१७-१८ मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आले आहेत. त्यामुळे हवालदिल झालेले शिक्षकांवर आता जुलै महिन्याच्या वेतनाविना सावकाराच्या दारावर उभे राहण्याची वेळ आली आहे. जुलै महिन्यात सर्व शिक्षकांना वेतनवाढ लावून वेतन अदा करणे गरजेचे असून काही पंचायत समित्यांमध्ये वेतनवाढ लावण्यास दिरंगाई केल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शिक्षकांचे वेतन झाले नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने उद्या (दि.३१) दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेचा घेराव करून रोष व्यक्त करणार आहेत.
जि.प.शिक्षक वेळावेळी अनेक समस्यांना तोंड देत असतात. त्यातच यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापूर्वी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या आहेत. या सार्वत्रिक बदल्यांमुळे आधीच शिक्षक हवालदिल झाले आहेत. त्यातल्यात्यात शिक्षकांना जुलै महिन्याचे वेतन मिळाले नाही. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून शिक्षकांचे वेतन न झाल्याने शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच वेतन होण्याचे संकेत अद्यापही दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांत संतापाची लाट पसरली असून ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर सभा घेऊन घेराव करणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष विरेंद्र कटरे,अनिरुध्द मेश्राम आदींनी केले आले.