आसोलीच्या ग्रामरोजगार सेवकांला हटवण्यावरुन ग्रामसभेत जुंपली

0
9

गोंदिया,दि.02ः- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे कार्य हे रोजगार सेवकाच्या अधिनस्त पार पडत असते. मात्र, जवळील आसोली येथील ग्राम रोजगार सेवकाचा गैरकारभार हा खंड विकास अधिकार्‍यांपयर्ंत पोहचल्यानंतरही कारवाई झाली नाही. त्यातच १५ ऑगस्टच्या तहकूब ग्रामसभेनंतर २८ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत हा विषय चचेर्ला आल्यानंतर सभेत ग्राम रोजगार सेवकांच्या कारभाराला घेवून दोन गटात चांगलीच जुंपली व प्रकरण पोलिस ठाण्यात पोचले.पोलिस निरीक्षक नारनवरे यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार भुरे व कोडापे हे चौकशी करीत आहेत. त्यातच ग्राम विकास अधिकारी जाधव यांनीही या प्रकरणाची माहिती पंचायत समिती प्रशासनाला दिली आहे. तेव्हा, चौकशीत दोषी आढळलेल्या ग्राम रोजगार सेवकावर कारवाई होते की नाही याकडे लक्ष्य लागले आहे.
सविस्तर असे की, गोंदिया तालुक्यातील आसोली हे गाव नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. त्यातच येथील ग्राम रोजगार सेवक धनेंद्र हुमे यांच्याविरुद्ध मजुरांकडून होत असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणच्या अनेक तक्रारी ग्रामपंचायतला करण्यात आल्या. तसेच पंचायत समितीच्या खंड विकास अधिकार्‍यांनीसुद्धा प्रकरणाची चौकशी करून ग्राम रोजगार सेवकाला दोषी ठरविले होते. त्याचअनुषंगाने ग्राम रोजगार सेवकाला निष्कासित करण्याविषयी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, १५ ऑगस्ट रोजी सभा तहकूब झाल्याने हा विषय २८ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत आला. यावेळी ग्राम रोजगार सेवकांचे सर्मथक तसेच आर्थिक देवाण-घेवाणीच्या आरोप लावणार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवीगाळाने सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोचला.विशेष म्हणजे, या ग्रामसभेत दोन्ही बाजूकडील महिलांनी एकमेकांना मारहाण केल्याचे दिसून आले. ग्रामसभेत झालेल्या मारहाणचे प्रकरण दोन्ही पक्षांनी तक्रार नोंदविली.