‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचतील- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
11
  • ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या वाशिम शाखेचा शुभारंभ
  • आता पोस्टमनद्वारे बँक पोहोचणार घरापर्यंत

वाशिम, दि. ०2 : आर्थिक समावेशकतेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ (आयपीपीबी) च्या वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोस्ट अकौंट नागपूर विभागाचे संचालक एस. के. पांडे, जिल्हा परिषद सदस्य रितेश मलिक, भूपेश थुलकर, तेजराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.

श्री. आठवले पुढे म्हणाले, टपाल खाते व पोस्टमन यांनी आजपर्यंत देशभरातील नागरिकांचे सुख-दुःखाचे संदेश नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मनीऑर्डर, बचत खाते, आरडीसारख्या आर्थिक सुविधा पुरवून जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, वंचित घटकांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नात आता टपाल खाते सहभागी होत असून प्रत्येक पोस्टमन आता बँकिंग सुविधा घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन स्वरूपातील बँकिंग वाढले असल्याचे सांगून श्री. आठवले म्हणाले, कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या माध्यमातून सुद्धा आधुनिक, अद्ययावत बँकिंग सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच बँक खाते उघडणे करणे तसेच बँकेचे व्यवहार करण्याची प्रक्रिया सोपी राहणार आहे. याकरिता पोस्टमन नागरिकांच्या घरापर्यंत जावून या सुविधा पुरविणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’चे क्यू-आर कार्ड व स्पेशिअल कव्हरचे अनावरण यावेळी श्री. आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ खातेधारक नागरिकांना क्यू-आर कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी वाशिम पोस्ट शाखेचे विपणन अधिकारी सुनील लखाने, पोस्ट मास्तर एस. जी. गर्दे, डाक निरीक्षक नरेश शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चाफेश्वर गंगावणे यांनी केले.