विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे- मोक्षदा पाटील

0
43
  • लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ

वाशिम, दि. ०2 : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या युगात शासकीय व निमशासकीय सेवेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचनासोबत कठोर परिश्रम केले तरच यश निश्चित आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

१ सप्टेंबर रोजी श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथील सभागृहात जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित विद्यार्थी लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ श्रीमती पाटील यांनी केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष ॲड. किरणराव सरनाईक होते. प्रमुख मागदर्शक म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, नायब तहसिलदार एल. आर. बनसोडे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. निलेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.

श्रीमती पाटील म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय आधी निश्चित केले पाहिजे आणि हे ध्येय गाठण्यासाठी नियोजन, वेळेचे महत्व आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. मुलींनी आता प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या बाल गुन्हेगारी, महिलांवरील होणारे अत्याचार, गुन्हेगारांना कठोर शिक्षा या विषयावरील प्रश्नांची उत्तरे दिली.

अध्यक्ष म्हणून बोलतांना ॲड. श्री सरनाईक म्हणाले, लोकराज्य मासिकाची उपयुक्तता लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्यांनी यांचे वर्गणीदार झाले पाहिजे. लोकराज्यमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती येत असल्यामुळे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. समाजमाध्यमांचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी करावा. वाचन संस्कृती लोप पावत असतांना वाचाल तरच वाचाल, अशी म्हणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगीतले.मार्गदर्शक म्हणून बोलतांना श्री. खारोडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना संदर्भ साहित्याची निवड करावी. लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र असलेले मासिक आहे. लोकराज्यचे विविध विषयांवर विशेषांक निघत असतात. लोकराज्यचा प्रत्येक अंक हा संग्रही असला पाहिजे. लोकराज्यमध्ये येणारी माहिती ही विश्वसनीय असते. आपल्या यशामध्ये लोकराज्यचा महत्वाचा वाटा असून समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. खंडरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना एकाग्र चित्ताने अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर वाचन केले पाहिजे. लोकराज्यमधील विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे सांगितले.श्री. बनसोडे म्हणाले, कोणत्याही परिक्षेची तयारी करावयाची असेल तर एकाग्रता ही अत्यंत महत्वाची आहे. आपआपल्या बुध्दीमतेनुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी वेळ द्यावा. स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी सतत ६ ते ७ तास नियोजनपूर्वक अभ्यास करावा. ही तयारी करतांना विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी पर्यंतची इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल व विज्ञानाची पुस्तके वाचावी, असे सांगीतले.

प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी लोकराज्य वाचक अभियानाची भूमिका विशद केली. तसेच युवा महितीदूत, मिजल्स व रुबेला लसीकरणाची माहिती दिली. यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला विविध पुस्तके व ग्रंथ भेट म्हणून अध्यक्ष ॲड. सरनाईक यांना दिले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वर्ग, बी. एस. डब्ल्यू आणि एम. एस. डब्ल्यूचे जवळपास ३०० विद्यार्थी उपिस्थत होते. यावेळी लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला. अनेकांनी लोकराज्यच्या विविध अंकाची खरेदी केली.संचालन प्रा. मंगेश भूताडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. पंढरी गोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माहिती सहाय्यक तानाजी घोलप, प्रा. वसंत राठोड, प्रा. किशोर वहाणे, प्रा. प्रसेनजीत चिखलीकर, प्रा. जयश्री काळे, प्रा. पंडित नरवाडे, विजय राठोड, विश्वनाथ मेरकर, गजानन इंगोले यांनी परिश्रम घेतले.