पत्रकारांचे दु:ख समाजानेही समजून घ्यावे-देशमुख

0
22

-महासंपर्क अभियानास प्रतिसाद -दीड वर्षात २९ पत्रकारांना २० लाखांची मदत
नांदेड(नरेश तुप्तेवार),दि.०३ ::-       पत्रकारांकडून समाजाच्या अपेक्षा खूप आहेत़ परंतु हाच पत्रकार संकटात सापडला तर समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा मदतीचा नसतो़ त्यामुळे आम्ही महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न समाजासमोर मांडत आहोत, हे दु:ख समाजानेही समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस़एम़देशमुख यांनी केले़
मराठी पत्रकार परिषद मुंबई व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात महासंपर्क अभियान मेळावा पार पडला़ व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी सिध्दार्थ शर्मा, मिर्झा, शरद पाबळे, अनिल महाजन, विजय जोशी, राम शेवडीकर, चारुदत्त चौधरी, महापौर शीला भवरे, किशोर भवरे, बालाजी पवार, प्रदीप नागापूरकर, प्रकाश कांबळे, सुभाष लोणे, विश्वनाथ देशमुख उपस्थित होते़ प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ महाजन, शर्मा यांनी समयोचित मार्गदर्शन केले़ नंतर एस़एम़देशमुख म्हणाले की, पत्रकारांसाठी संरक्षण कायदा तयार करुन घेणे, पेन्शन योजना लागू करणे आदीबाबत आपण सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे़ सरकारकडे नेहमी मागण्यांचा पाठपुरावा सुरुच आहे़ परंतु त्याचवेळी पत्रकारांनी आपल्या संकटासाठी विशेषत: आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी कॉर्पस फंड अर्थात स्थायी निधी गोळा केला पाहिजे़ त्यातून गरजूंना आवश्यक तेवढी मदत करता येईल़ आम्ही परिषदेच्या माध्यमातून २९ पत्रकारांना वैद्यकीय उपचारासाठी दीड वर्षात तब्बल २० लाखांची मदत मिळवून दिली आहे़ अजूनही प्रयत्न सुरुच आहेत़ राज्यातील पत्रकारांच्या पाठीशी समस्त पत्रकार एकजुटीने उभा ठाकत आहे ही आनंदाची व समाधानाची बाब आहे़
पत्रकारांमध्ये मतभेद असावेतच परंतु मनभेद असता कामा नये, कारण संकटात एकमेकांना मदत केल्याशिवाय समाजही पाठीशी राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला़ छोटी वृत्तपत्रे जगली पाहिजेत, यासाठी तुम्ही आम्ही संघर्ष करीत आहोत़ परिणामी सरकारला नवीन जाहिरात धोरण मसुद्याचा फेरविचार करायला भाग पाडणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ छायाचित्रकार करणसिंह बैस यांनी १५० वृत्तपत्र वितरकांचा एक वर्षाचा विमा काढल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला़ कुलदीप नंदूरकर यांनी सूत्रसंचालन व प्रकाश कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले़

कार्यालयाचे उद्घाटन
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यालय व्हीआयपी मार्गावरील बालाजी टॉवर येथे असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जि़प़चे सीईओ अशोक काकडे, प्रदीप चक्रवार,एस़एम़देशमुख, संजीव कुळकर्णी, सिध्दार्थ शर्मा, मिर्झा, शरद पाबळे,अनिल महाजन, प्रदीप नागापूरकर, राम शेवडीकर, चारुदत्त चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले़ यावेळी मान्यवर अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी जी मदत करता येईल ती करु अशी ग्वाही दिली़
वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेले विकास भालेराव यांचे नुकतेच अकाली निधन झाले़ त्यांच्या पत्नी वसुंधरा भालेराव यांना एस़एम़देशमुख, जिल्हाधिकारी डोंगरे व अन्य मान्यवरांच्याहस्ते आर्थिक मदत व धर्माबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने भालेराव यांना शिलाई मशीनचे वाटपही करण्यात आले़