भाजपाची राज्यातील सदस्य संख्या ६१ लाख-प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे

0
15

मुंबई-भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातील प्राथमिक सदस्यांची संख्या ६१ लाख ३४ हजार झाली असून हा आतापर्यंतचा राज्यातील सदस्यसंख्येचा उच्चांक आहे. सदस्य संख्येबाबत खूप महत्त्वाचा टप्पा गाठल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून एक कोटी सदस्य नोंदणीचे ऐतिहासिक उद्दिष्ट गाठण्यासाठी पक्ष नव्या उत्साहाने कामाला लागला आहे, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मा. दानवे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आपली सहा जानेवारी रोजी घोषणा झाली. त्यावेळी राज्याचे भाजपाचे २२ लाख ४५ हजार सदस्य होते. गेले ५४ दिवस राज्यातील भाजपाची सदस्यसंख्या वाढण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून पक्षाची राज्यातील सदस्यसंख्या मंगळवारी ६१,३४,२२२ झाली होती. सदस्यता नोंदणीबाबत ६१ लाखाचा महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर पक्षाने ३१ मार्चपर्यंत अखेरच्या महिन्यात सर्व शक्ती पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. पक्षाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर त्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. बूथपातळीपर्यंत प्रयत्न करून अभियानाच्या अंतिम महिन्यात जोरदार प्रयत्न करण्याचा सर्वांचा निर्धार आहे.

राष्ट्रीय पातळीवर पक्षाध्यक्ष मा. अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली सदस्यता अभियानाचे काम प्रभावीपणे चालू आहे. देशामध्ये आता भाजपाच्या सदस्यांची संख्या सहा कोटी बारा लाख इतकी प्रचंड झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, भाजपाच्या सदस्यनोंदणीसाठी आपण स्वतः तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रमाणे भाजपा सदस्य नोंदणीसाठी मोहीम चालू आहे. आपण स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करत आहोत. मा. मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्र्याला एक – दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली असून त्यांनी त्या जिल्ह्यांचा दौरा करून सदस्यता अभियानाला चालना दिली. पक्षाचे प्रदेश पातळीवरील सर्व पदाधिकारी या महाअभियानात उतरले. त्यांचेही राज्यात ठिकठिकाणी दौरे झाले. पक्षाच्या प्रत्येक आमदार, खासदार तसेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारालाही सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सुराज्य असावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशाच्या पुननिर्माणाच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांनी पक्षाचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाचा सदस्य होणे म्हणजे भारत देश प्रगत बनविण्याच्या योजनेत सहभागी होणे असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी 18002662020 या क्रमांकावर आपल्या मोबाईलवरून मोफत कॉल करून पक्षाचे सदस्य व्हावे.