आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार-किर्तिकर

0
9
गोंदिया,दि.08ः- शिवसेनेचे लोकसभा निहाय कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. या निमित्ताने बुथयंत्रणा मजबुतीसाठी आम्ही कार्य करीत आहोत. आगामी लोकसभा, विधानसभा व इतर सर्व निवडणूका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खा. गजानन कीर्तीकर यांनी केले. ते ५ सप्टेंबर रोजी गुर्जर क्षत्रीय सभागृह गोंदिया येथे जाहीर मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, माजी आ. नरेंद्र भोंडेकर,गोंदिया जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, माजी खासदार प्रकाश जाधव आदि उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, २०१४ मध्ये कॉंग्रेसला सत्ताबाह्य करण्याचा संकल्प आम्ही भाजप सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चहेरा समोर केला होता. बेरोजगारी, महागाई व इतर समस्या दूर करण्याचा आमचा हेतू होता. मात्र तो साध्य झाला नाही. नोटबंदीचा निर्णय आम्हाला विश्‍वासात न घेता केला. काळा पैसा निघून दहशतवाद संपूष्टात येईल असे सांगितले. मात्र, याउलट कारखाने बंद होऊन बेरोजगारी वाढली व आत्महत्या वाढल्या. यानंतर जिएसटी आणून ग्राहकांच्या वस्तूची किंमत वाढवून व्यापार्‍यांचा मुनाफा कमी केला व सरकारी तीजोरी वाढविली. ते विकास कामांचा दावा करीत असले तरी जिएसटी व नोटबंदीने देशावर मोठे संकट आले आहे.
मागील लोकसभेत त्यांना युती पाहीजे होती, सत्तेवर येताच त्यांनी विधानसभा निवडणूकीत युती तोडली. सेनेला ६३ जागा मिळाल्या तर भाजपला १२२ जागा प्राप्त झाल्या पण याने भाजपचे स्वबळावर सरकार बनत नव्हते. राष्ट्रपती राजवट नको म्हणून हिंदूवादी संघटनेच्या आधारावर आम्ही त्यांना पाठींबा दिला आहे. विदर्भात आम्ही प्रत्येक ठिकाणी बुथ प्रमुख नेमत असून सेनेला मजबूत करण्याचे काम करित आहोत. येणार्‍या निवडणूकीत येथील राजकीय परिस्थिती बदलेल असा दावा त्यांनी केला. मेळाव्यापुर्वी खा.किर्तिकर यांचे कुडवा नाका येथे स्वागत करण्यात आले.त्यांनतर मोटारसायकल रॅलीने त्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.कार्यक्रमाला तिरोडा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर,जिल्हा उपप्रमुख तेजराम मोरघटे,लांजेवर ,शैलेष जायस्वाल,हिरालाला साठवणे,मनिष गौतम,सुनिल सेंगर,बापी लांजेवार,मनोज भैसारे,सुरेंद्र नायडू,सदाशिव विठ्ठले, शिवसेनेच्या महिला जिला संघठक सुरेखा चव्हाण, उपजिल्हा संघटक इंद्रमणि मरुबन, तालुका संघटक गायत्री सरकार, विधानसभा संघटक दिल्लू गुप्ता, उपतालुका प्रमुख अरुण हिरापुरे, युवा सेना तालुका उपाधिकारी अमोल दमाहे, शहर उपप्रमुख राजू नागरिकर यांच्यासह भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुकाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख,बुथप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.