आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरील उपाय नव्हे – डॉ. अनिल कावरखे

0
21
  • जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती रॅली

वाशिम, दि. ११ : आयुष्यातील चढउतार, अपयश यामुळे येणाऱ्या मानसिक तणावातून अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडतात. मात्र आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. आत्महत्येमुळे समस्या सुटणार नाही. त्यासाठी आत्मविश्वासाने, धैर्याने संकटाला तोंड देवून त्यावर मात केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त आयोजित जनजागृती रॅलीप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश झरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रवींद्रकुमार अवचार, डॉ. आदित्य पांढरकर यांची उपस्थिती होती.डॉ. कावरखे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी बांधवांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी डॉ. कावरखे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या रॅलीद्वारे शेतकरी आत्महत्या रोखण्यासह, व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज, रेनॉल्ड नर्सिंग कॉलेज, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रममधील मंगेश भाग्यवंत, आर. डी. दुधाळकर, संदीप आढाव, एस. डी. अंभोरे, पल्लवी गायकवाड, राहुल कसादे, मंगेश वानखेडे, दिनेश वाघ, राम सरकटे, रामकृष्ण धाडवे यांनी परिश्रम घेतले.