‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’योजनांचा `मनरेगा` राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

0
22

नवी दिल्ली दि.11 –: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने मनरेगा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीत एकूण 237 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजवणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला आज पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार रोजगार हमी योजना आयुक्त ए.एस.आर. नाईक, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे व कमलकिशोर फुटाने यांनी स्वीकारला.रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापनांतर्गत एनआरएममध्ये एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत. यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झालेला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान
गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. या जिल्ह्यास याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. रोजगार हमी आयुक्त तसेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक, विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग, उपायुक्त के.एन.राव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत बहरे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघन यांनी पुरस्कार स्वीकारला. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली. यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मनरेगांतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आले. जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार 750 कामे पूर्ण झालेली आहेत.

नागरी ग्रामपंचायतीचा सन्मान
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉक मधील ‘नागरी ग्रामपंचायती’ला गौरविण्यात आले. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी 38 कामे पूर्ण केली. या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.