कोरची दलमच्या १७ वर्षिय युवती नक्षलीने केले आत्मसमर्पण

0
36
गोंदिया,दि.१४ः- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील लवारी निवासी १७ वर्षिय नक्षल युवती रजुला उर्फ अनिता रवेलसिंग हिडामी हिने २४ आगस्ट रोजी अप्पर पोलीस अधिक्षक देवरी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते.आज १४ सप्टेबंर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीसमोर हजर केल्यानंतर सदर युवतीला आत्मसमर्पण योजनेचा लाभ देत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी पत्रपरिषदेत दिली.पोलीस अधिक्षक कार्यालयात आज शुक्रवारला आयोजित पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप आटोळे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी बलकवडे यांच्या हस्ते आत्मसमर्पित युवतीचे स्वागत करण्यात आले.गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले यामध्ये २०१४ मध्ये २ व २०१८ मध्ये १ चा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील लवारी निवासी १७ वर्षिय युवती ही आदिवासी आश्रमशाळा गोटे येथे सातव्या वर्गाचे शिक्षण घेतल्यानंतर आईवडीलाकंडे गावातच राहत होती.याच दरम्यान ती घरगुती कामासह शेळ्या चारण्याचे काम करीत असतानाच जुर्ले २०१७ मध्ये गावाबाहेरील जंगल परिसरात शेळ्या चारत असतांना नक्षलवाद्यांनी तिच्याकडील मोबाईल हिसकावून रस्ता दाखविण्याचा बहाण्याने सोबत नेले होते.तिथे नक्षल्यासोबत ६-७ दिवस राहिल्यानंतर परत मला घरी जाऊ द्या अशी विनवनी केल्यानंतर मात्र तिला पोलीस तुला अटक करतील व तु नक्षलवादी आहे हे समजतील अशी भिती दाखवून परत न पाठविल्याने तिला नाईलाजाने त्यांच्यासोबत रहावे लागले.मात्र संधीचा लाभ घेत एका महिला नक्षलीच्या मदतीने ऑगस्ट महिन्यात परतली होती.घरी परतल्यानंतर आई व भावाने गावातील पंचाना माहिती देत नक्षवाद्यांनी तिला पळवून नेले होते आता ती परत आली असून दलम मध्ये जायचे नाही असे म्हणत असल्याची माहिती दिली.त्यानंतर तिला तिच्या मोठ्या आईच्या गावी कोरची(कुकडा)येथे नेऊन दिले.त्यानंतर परत लवारी गावात नक्षल्यांनी येऊन विचारणा करु लागल्याने तिला तिच्या मामाच्या गावी पाठविण्यात आले.तिथे राहत असताना आणि नक्षल्याच्या भीतीमूळे तिच्या काकांनी याची माहिती पोलीसांना दिली.आणि देवरीच्या दोन पोलिसांना सोबत घेऊन गेले आणि तिला अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप आटोळे यांच्यासमोर उपस्थित केले.त्यानंतर तिने आपणास परत नक्षल्यासोबत राहयाचे नसून शिक्षण घ्यायचे आहे असे सांगत आत्मसमर्पण केले.
तिने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१७ मध्ये टिपागड दलमसोबत एपीटी मिqटग होती,त्यावेळी रात्री मुक्कामाला असताना छत्तीसगड पोलिसासोंबत सकाळी ५ वाजेच्या सुमारास चकमक झाली होती.त्यानंतर कुमुळ गाव परिसरात पुन्हा दोन दिवसानंतर चकमक झाली असता पार्टीचे नुकसान झाले.चकमकीमध्ये इंसास रायफल,३०३ रायफल एक,३ बारोबार बंदुक व इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागले होते.त्यानंतर एप्रील २०१८ मध्ये केशोरी पोलीस ठाण्यांतर्गतच्या नागणडोह जंगलभागात कॅम्प लावून रात्रीला मुक्काम केले असता कोरची दलमचे ३ नक्षलवादी सोबत होते ते नागणडोह गावात जाऊन फायरिंग केली होती.त्यामध्ये नक्षली सतिश दिनकर गोटा हा जखमी झाला होता.तेव्हा जखमी नक्षलवाद्याला सोबत घेऊन पळून गेल्याची माहिती रजुलाने पोलीसांना दिली.हे सर्व होत असतानाच लवारी जवळील जंगलात रात्रीला मुक्काम असताना दलम सदस्य अंजली हिने झोपेतून उठवले आणि तुला घरी जायची इच्छा असेल तर आत्ताच पळून जा नाहीतर तुला छत्तीसगडमध्ये ट्रेqनगवर पाठविल्यानंतर तुला तिथेच ठेवणार हे सांगितल्यानंतर तिने बंदुक तिथेच ठेवून निघाल्याचे सांगितले.
मला शिक्षण घेऊन पोलीसात जायचे
आत्मसमर्पित नक्षली रजुलाने बेरार टाईम्सशी बोलतांना सांगितले की,नक्षलवादी हे वाईट असून आदिवासी युवक युवतींना खोटे आमिष देऊन आपल्या सोबत ठेवतात.मला ज्या दलमने घेऊन गेले त्यांच्यासोबत ३ पुरुष व ३ महिलांचा समावेश होता.तिथे आंगोळ करायलाही भेटत नाही.जेवणाचीही व्यवस्थित सोय नसते.कधीही रात्री बेरात्री जंगलातूनच चालावे लागते या सर्व प्रकारामुळे मी कंटाळले होेते.त्यातच गावी परतून शिक्षण पुन्हा सुरु करावे असे वाटत असतानाच एका रात्री त्या दलममधील अंजली नामक महिलेने मला पळून जाण्यास सांगितल्याने मी पळून येऊ शकले.आता मला पुन्हा शिक्षण घ्यायचे असून शिक्षण पुर्ण झाल्यानंतर पोलिस बनूनच सेवा करायची इच्छा व्यक्त केली.