३३ वर्षांपासूनची शांतता भंग करण्याचा प्रयत्न

0
14

गोंदिया: ब्रिटीशांच्या काळात झालेला हिंदू-मुस्लीम वाद गोंदिया जिल्हा पोलिस आता ग्राह्य धरीत आहे. मागील ३३ वर्षापासून सडक-अर्जुनीत हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय सलोखा नांदत असताना पोलिसांनी गणेश भक्ताला मिरवणुकीत भाग घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पोलीसच गावातील शांतता भंग करण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी केला आहे.
ब्रिटीशांच्या काळात सडक-अर्जुनी येथे जातीय दंगल घडली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर सडक-अर्जुनी येथे मागील ३३ वर्षापासून शिव गणेश मंडळ गणेश स्थापना करीत आहे. या गावात दिवाळी व ईद हे दोन्ही सण हिंदू-मुस्लीम समाजबांधव एकोप्याने साजरा करतात. परंतु या परंपरेला छेद लावण्याचे काम पोलीस करीत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत सडक-अर्जुनी या गावाने विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. त्यांचा गौरव मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला होता. दरवर्षी गणेशोत्सवात शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू-मुस्लीम यांच्या बैठका घेतल्या जातात.
यंदाही आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्या. या सहा बैठकांमध्येही सर्व धर्माच्या लोकांनी सण शांततेत साजरा होईल असे सांगितले. परंतु डुग्गीपारचे ठाणेदार यांनी ९ सप्टेंबर २०१८ रोजी जा.क्र.२२८६/२०१८ च्या पत्रान्वये अचानक १४ सप्टेंबर २०१८ ला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मला गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेऊ नका असे पत्र काढले. मिरवणुकीत भाग घेतल्यास कलम १४४ अन्वये कारवाईचे पत्र दिल्याचे गिऱ्हेपुंजे यांनी सांगितले. सडक-अर्जुनी येथे २५ टक्के मुस्लीम बांधव आहेत. माझ्या संदर्भात ना हिंदूची, ना मुस्लीम बांधवांची तक्रार आहे. परंतु पोलीस विभागाच मला संशयाच्या भोवक्तयात घेत मिरवणुकीत भाग न घेण्याचे नोटीस बजावले आहे.
ते गुन्हे राजकारणामुळे
मी राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहे. राजकारण किंवा समाजकारण करताना आलेल्या अडचणींमुळे विरोधातला व्यक्ती तक्रार करतो व पोलीस गुन्हे दाखल करतात. असे १९८९ पासून २००४ या काळात ९ गुन्हे दाखल केलेत. परंतु या गुन्ह्यांमध्ये मला अडकविण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने यापैकी निकाली काढलेल्या कोणत्याही गुन्ह्यात मी दोषी आढळलो नाही. गणेशोत्सवात माझ्यावर कसलेही गुन्हे दाखल नसताना पोलीस विभाग मला शांतता भंग करणारा व्यक्ती ठरवून मला समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गिऱ्हेपुंजे यांनी केला आहे.