१५ दिवसात गावनिहाय बैठका घेऊन फेर आराखडा सादर करा – पालकमंत्री बडोले

0
13

सडक/अर्जुनी ,दि. २३ :– जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असलेल्या गावांच्या १५ दिवसात गावनिहाय बैठका घेऊन फेर आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी यंत्रणेला दिले.अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत जलयुक्त शिवार कामे आढावा बैठक पंचायत समीती हॉल सडक/अर्जुनी येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस लोकप्रतिनिधी व जलयुक्त शिवार अभियानाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये गावनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनीधी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी सुचविलेली बरीच कामे नसल्यामुळे पुढील १५ दिवसात गावनिहाय बैठका घेऊन फेर आराखडा सादर करण्याचे आदेश पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांनी सर्व यंत्रणांना दिले.या बैठकीत बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या योजनेत घेण्यात येणारी कामे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी विचार विमर्श करून घेण्यात यावीत. त्याचप्रमाणे नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात यावे असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.