गरजूंना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे- पालकमंत्री बडोले

0
7

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण सोहळा
ङ्घ लाभार्थ्यांना ई-कार्डस् चे वाटप
गोंदिया,दि.२३ : केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्रम देशभरात राबविण्याचा निर्णय घेवून आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आयुष्यमान भारतह्नप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करुन गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज २३ सप्टेंबर रोजी आयुष्यमान भारतह्नप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरीश बैजल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमादे खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, नगरसेविका भावना कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, ही योजना नि:शुल्क आहे. यात केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरणार आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रति वर्ष/प्रति कुटूंब रुपये १.५० लक्ष एवढ्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार अनुज्ञेय असून मुत्रापिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा रु.२.५० लक्ष एवढी आहे. या योजनेअंतर्गत सध्या शासकीय रुग्णालयामधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लाभार्थी कुटूंबांना प्रति वर्ष ५ लक्ष रुपयांपर्यंतचे सर्जिकल व मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी योग्यरितीने व्हावी, जेणेकरुन गरजू व्यक्तींना लाभ घेण्यास अडचण जाणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रीमती मडावी म्हणाल्या, या योजनेचा उद्देश फार चांगला आहे. कारण शेवटच्या घटकातील गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गोर-गरिबांचा आशिर्वाद निश्चितच आपल्याला मिळणार आहे असे त्या म्हणाल्या.
श्री.अंबुले म्हणाले, या योजनेचा आशा सेविकामार्फत व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात यावा, जेणेकरुन या योजनची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. या योजनेची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुध्दा उपलब्ध करुन देण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारतह्नप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत लाभार्थ्यांना ई-कार्डस वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य‍चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी केले. संचालन ॲड. श्रध्दा सपाटे यांनी केले, उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी मानले. कार्यक्रमास आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा सेविका व आरोग्य सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.