बिबट्याचा बालिकेवर हल्ला

0
12

ब्रह्मपुरी,दि.01ः- तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील ८ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३0 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले, मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलाने बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली व गावकर्‍यांच्या सतर्कतेने मुलीचे प्राण वाचले.परिसरातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने गावकर्‍यांमध्ये दहशत असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
हा अंगावर शहारे आणणारा भयावह प्रसंग चिचगाव येथील ऐश्‍वर्या राजेश्‍वर अलोणे या बालिकेवर ओढवला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे बिबट्याच्या जबड्यातून ऐश्‍वर्याला सोडवण्याचा प्रयत्न खुद्द मुलीचे वडील राजेश्‍वर यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांना गावकर्‍यांनी साथ दिली.
राजेश्‍वर अलोणे व मुलगी ऐश्‍वर्या जेवणानंतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने व होणार्‍या उकाड्याने घराच्या अंगणात उभे होते.त्याचवेळी अंधारात घराजवळच दबा धरून असलेल्या बिबट्याने एश्‍वर्यावर हल्ला करीत तिची मान जबड्यात पकडली त्याच वेळी राजेश्‍वरने बिबट्याचा मागचा पाय पकडून मुलीचा प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड करू लागला व क्षणात गावातील लोक गोळा झाले,त्याचवेळी बिबट्याने जोराचा झटका देत ऐश्‍वर्याला जबड्यात घेऊन पळू लागला गावकर्‍यांनी बिबट्याचा पाठलाग केला अखेर बिबट्याने जवळपास ३00 मीटर अंतरावर ऐश्‍वर्याला सोडले व जंगलाच्या दिशेने पळून गेला. क्षणाचाही विलंब न लावता राजश्‍वरने गावकर्‍यांच्या मदतीने जखमी अवस्थेत ऐश्‍वर्याला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
झाल्या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली.वनविभागाचे कर्मचारी देखील ग्रामीण रुग्णालयात आले. दरम्यान क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे एका कार्यक्रमानिमित्ताने ब्रह्मपुरी येथे मुक्कामी होते.त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. वडेट्टीवार यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली.रुग्णालयात येताच ऐश्‍वर्याच्या उपचाराची व प्रकृतीची विचारपूस करीत आणखी चांगले उपचार करण्यासाठी मुलीचे वडील राजेश्‍वर यांना तात्काळ आर्थिक मदत केली. यावेळी उपस्थित वनविभागाचे अधिकारी यांना बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा जंगल व्याप्त गावाशेजारील वाढलेले गवत काढून वन्य प्राण्यांना दबा धरण्यासारखी ठिकाणे नष्ट करा अश्या सूचना दिल्या.