अभियंत्याच्या कानशिलात हाणली

0
16

भंडारा,दि.03ः- धान पिकासाठी पाण्याची मागणी करीत परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवारी खुर्शिपार येथे रास्तारोको आंदोलन केले होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेले पेंच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांच्या कानशिलात लावण्यात आली तसेच त्यांना घेराव घालून अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. अभियंत्यांच्या तक्र ारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धान पिकाला पाणी मिळावे या मागणीसाठी सोमवारी शेकडो शेतकर्‍यांनी खुर्शिपार येथे आंदोलन करून भंडारा-रामटेक मार्ग अडवून ठेवला होता. काही ठिकाणी जाळपोळसुद्धा करण्यात आली होती. परिस्थिती चिघळत असल्याने पेंच पाटबंधारे विभागाचे अभियंता नितीन सोनटक्के हे आपल्या शासकीय वाहनाने शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी खुर्शिपार येथे गेले होते. तथापि, शेतकर्‍यांचा जमाव अधिकच संतप्त झाला. त्यातच नरेश झलके (४0) रा. खुर्शिपार याने सोनटक्के यांच्या गालावर थापड मारली. तसेच अश्लिल शिवीगाळ केली. तर अनिल कडव रा. टवेपार व विजय लिचडे रा. मोहदूरा या दोघांनी त्यांना ओढताण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. नितीन सोनटक्के यांच्या तक्र ारीवरून भंडारा पोलिसांनी तिघांवरही कलम ३५३, ३३२, २९४, १८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.