२६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी मिलिंद रंगारी

0
21

तिरोडा,दि.04ः- तालुक्यातील मुंडीकोटा(रेल्वे) येथे दिनांक८ व ९ डिसेंबर २०१८ ला होऊ घातलेल्या २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी युवा साहित्यिक व नाटककार मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.
मुंडीकोटा (रेल्वे) येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्या पुनर्गठन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून मिलिंद रंगारी यांच्या नावाची घोषणा केली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, २५ वे संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर, गोंदिया जि. प.चे सदस्य मनोज डोंगरे, मुंडीकोटा ग्रा.पं. चे सरपंच कमलेश आतिलकर, कवी डोमा कापगते, मुंडीकोटा झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष भाऊराव नागमोती, सचिव फ.रा.काटवले,प्रा. राजेन्द्र पटले, राजेश डोंगरे व पदाधिकारी उपस्थित होते.
मिलिंद रंगारी यांचा जन्म गोंदिया जिल्ह्यातील मानेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला असून एम.एस्सी.बी.एड.,एम.ए.(शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र), पी.जी.डीप. वि.जी.(मुंबई) असा त्यांचा शैक्षणिक आलेख आहे. सालेकसा तालुक्यातील पंचशील हाय.व कनिष्ठ महाविद्याल मक्काटोला येथे त्यांनी मागील २१ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले असून सध्या ते जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसाय विकास संस्था गोंदिया येथे समुपदेशक या पदावर कार्यरत आहेत.
मिलिंद रंगारी हे साहित्यिक, कवी व नाटककार असून आतापर्यंत त्यांचे ‘झाडीची माती’,’बोनस मिळणार आहे’,’रुद्रावतार वसुंधरेचे’, ‘झाडीचा राजा हरिश्चंद्र’,’शिदोरी’ हे साहित्य प्रकाशित झाले आहेत. ‘आकांत-एक विषारी चक्र’,’घायाळ’, ‘चक्रव्यूह जीवनाचे’, ‘राजकारण’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘पुण्याई आई बाबांची’, ‘शाळा शिक रे पोरा’ ही नाटकं संपूर्ण झाडीपट्टीमध्ये गाजली आहेत.
‘टर्निंग पॉईंट’ हा त्यांचा शैक्षणिक एकपात्री प्रयोग असून ‘गुप्तहेर’, ‘बळी’, ‘कहर’, ‘आपली मानसं’, ‘नवजीवन’, ‘पोरगी पराली पाटलाची’, ‘आधार कुणाचा’, ‘जगा आणि जगू दया’, ‘धग’ इत्यादी साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद व भजेपार येथील झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवले आहे. आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील ‘भवभूती नाट्य पुरस्कार’ व ‘मुकुंदराज काव्य पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले. ते म.रा. शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे नागपूर विभागीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ विभागीय सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ आमगाव चे सदस्य व झाडीबोली साहित्य मंडळाचे गोंदिया जिल्हा प्रमुख अशा विविध साहित्य व सामाजिक पदांवर कार्यरत आहेत. त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त केल्या जात आहे.