मुख्य कार्यकारी अधिकार्यांना शिक्षक भारतीचे निवेदन

0
15

सांगली,दि.10ः- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 12 वर्ष व 24 वर्ष पुर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी शिक्षकांकडून प्रशिक्षणाचे हमीपत्र घेऊन निवड वेतनश्रेणी मंजूर करण्यासंबधीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना सादर केले.तसेच मुकाअ सोबत इतर विषयावर चर्चा सुध्दा केली. चर्चेच्यावेळी शाळासिद्धीची वेबसाईट सुरू नसल्याने नविन शाळां पात्र असूनही माहिती भरता येत नसल्याचे अवगत करुन दिले.सोबतच विषय शिक्षकांना 4300 वेतनश्रेणी मिळावी ही मागणी करण्यात आली.निवेदन देतेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,कृष्णा पोळ,चंद्रशेखर क्षीरसागर,दिगंबर सावंत,बजरंग वीरभद्रे,संजय कवठेकर,हे शिक्षक भारती पदाधिकारी उपस्थित होते.

1 नोव्हेंबर 2005 पुर्वीच्या शिक्षकांचे अंशदान कपात ,सहाव्या वेतन आयोगाचे 3,4,5 वा हप्ता सदर शिक्षकांच्या भ.नि.नि.खात्यावर व्याजासह जमा करण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून करण्यात येत असून अद्यापही निकाली निघाली नसल्याचे लक्षात आणून देण्यात आले.वरिष्ठ मुख्याध्यापक,विषयशिक्षक,विस्तारअधिकारी पदोन्नतीची मागणी करण्यात आली.महिन्यातील 1 ल्या व 3 ऱ्या शनिवारी शिक्षण परिषद आयोजित करण्यात येऊ नये. या दिवशी कार्यालयीन कामे शिक्षकांना करता येतील,ही मागणी सुध्दा करण्यात आली. मिरज मधील शिक्षकांच्या पगारातून सन 2015-16 रोजी जादा कपात झालेल्या रक्कमा सदर शिक्षकांना व्याजासह मिळाव्यात.हा प्रश्न मिरज पंचायत समिती शिक्षण विभागाकडून प्रलंबित असून तो त्वरीत सोडविण्यात यावा आदी विषयावर चर्चा करण्याात आली असता मुकाअ राऊत यांनी सर्व मागण्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले.तसेच मिरज येथील प्रश्नासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी डाँ.राजेंद्र गाडेकर यांनी पाठपुरावा सुरू केल्याची माहिती दिली.