सर्पदंशाने मृत पावलेल्या मुलाला बरा करण्याची आयुर्वेदिक डॉक्टारांची हमी ?

0
9
– गोरेगावजवळील घोटी येथील घटना
गोंदिया,दि.१५ः- सकाळी शेतात चिमूकल्याच्या पायाला सर्पदंश झाला मात्र, आई रागवेल या भितीपोटी कुणालाही न सांगता तो एकाच जागी खेळत राहिला. अशात आईला हे कळताच तिने ताबडतोब त्याला घेवून दवाखाने गाठले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित करून शवविच्छेदनाचा सल्ला दिला. काही वर्षांपूर्वी पती सोडून गेले. आता या एकूलता एक बाळाचा जीव हातावर गेल्याने आईची शुध्द हरपली. शेवटी अंत्यविधीसाठी स्मशानभूमी गाठली. मात्र, तेवढ्यात एक देवदूतच आला. आणि त्यानी जे सांगितले तेव्हा सगळे सून्न झाले. बाळाचे प्राण वाचतील अशी हाक सर्वांच्या कानी पडली. आणि नव्या चर्चांना ऊत आला. ही घटना एखाद्या कथेप्रमाणे वाटत असली तरी प्रत्यक्षात १५ ऑक्टोबर रोजी याचा अनुभव शेकडो लोकांनी जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील घोटी या गावात घेतला.
आदित्य सुमेश गौतम वय ७ वर्षे असे त्या चिमूकल्याचे नाव आहे. घोटी येथील रहिवासी शिला सुमेश गौतम ह्या पतीच्या निधनानंतर आपल्या सात वर्षाच्या मुलगा आदित्य याचेसह मोलमजूरी करून सुखाने राहत होते. मात्र काल, १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या या सुखाला ग्रहण लागले.रविवार शाळेला सुट्टी असल्याने आदित्य आपल्या आई सोबत शेतात गेला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास आई शेतात धान कापत असताना धुèयावर खेळताना त्याला एका विषारी सापाने दंश केला. मात्र आई रागवेल या भितीपोटी त्याने ही गोष्ट आईला सांगितली नाही. मात्र एका तासानंतर आई जेव्हा पाणी पिण्यासाठी त्याचेजवळ आली असता तिला आदित्य अस्तव्यस्त दिसून आला. विचारणा केलेवर त्याने सर्पदंश झाल्याचे आईला सांगितले. दरम्यान, आईने त्याला कवेत घेवून गोरेगावचे ग्रामीण रुग्णालय गाठले मात्र, तिथे तज्ञ डॉक्टर नसल्याने १०८ रुग्णवाहिकेने त्याला गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित करून शवविच्छेदनाचा सल्ला दिला. मात्र, आदित्यच्या आईची शुध्दच हरपल्याने निर्णय घेता आले नाही. अशात त्याला गावी आणन्यात आले. आज, सोमवारी त्याचेवर गावातीलच स्मशानभूमीत विधीवत अंत्यविधी करत असताना परिसरातील एका व्यक्तीने गोरेगावपासून १५० किमी लांब मध्यप्रदेशातील कटंगीच्या सेवाधाम येथे आयुर्वेदिक डॉक्टर अशा रुग्णांवर उपचार करत असल्याचे सांगितले. तेव्हा सदर डॉक्टराशी फोनवरून संपर्क करून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. तब्बल तीन तासाचा प्रवास करीत डॉक्टरांनी स्मशानभूमी गाठून आदित्यची तपासणी करून उपचाराने बरे करण्याचे आश्वासन देत २४ तासाची अवधी मागीतला. तेव्हा आदित्यला स्मशानभूमीतून पुन्हा त्याच्या घरी नेण्यात आले असून सोमवारी रात्रीपासून त्याचेवर उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आयुर्वेदिक डॉक्टरांच्या उपचाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुनीच उपचार पद्धती……………
मी काही चमत्कार करणार नसून आयुर्वेदिक ही आपल्या देशातील जुनी उपचार पद्धती आहे. तर याचे प्रमाणही इतिहासात आहेत. मात्र ही पद्धती आता लोप पावली असून अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. सर्पदंशानंतर रुग्ण सात दिवसापर्यंत समाधी अवस्थेत राहत असून आयुर्वेदिक उपचाराने बरा होऊ शकते. तेव्हा मी देखील तिच उपचार पध्दती त्याचेवर करणार असून मला एक संधी देण्याची विनंती केली.त्यावर उपस्थितांनी होकार दिल्यानंतर आज रात्रीपासून उपचाराला सुरुवात करणार असल्याचे मध्यप्रदेशातील कटंगीच्या सेवाधाम येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी  सांगितले आहे.
हे शक्य नाही
दरम्यान सर्पदंशाने मृत झालेल्या मुलाचा पुन्हा जिंवत होण्याचा प्रश्नच उदभवत नसून डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.जर त्या मुलाला जिवंत करण्याचे जी व्यक्ती आश्वासन देत आहे त्या व्यक्तिने त्या मुलाला जिवंत न केल्यास त्याच्यावर गुन्हा सुध्दा दाखल होऊ शकतो असे अनिंससह काही सर्पमित्रांचे म्हणने आहे.