जिल्ह्यात ओबीसी वेगळा पर्याय निवडणार

0
8

देसाईगंज,दि.16ः-प्रत्येकच राजकीय पक्षांनी ओबीसींच्या प्रश्नाचे राजकारण करीत जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गावर सातत्याने अन्याय केला. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेले ओबीसींची आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्‍वासनही हवेतच विरले आहे. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या ओबीसी प्रवर्गातील नागरिक एकटवले असून, त्यांनी एका बैठकीत वेगळा राजकीय पर्याय शोधण्याचे ठरविले आहे.
तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिरात १४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी समाजातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी धनपाल मिसार होते. बैठकीला जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, माजी न.प. उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर, ओबीसी नेते प्रा. शेषराव येलेकर, रुचित वांढरे, चौधरी, मस्के, पं. स. सदस्या अर्चना ढोरे, विसोराच्या सरपंच मंगला देवढगले, आमगावचे सरपंच योगेश नाकतोडे, सावंगीचे सरपंच राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, चोपचे उपसरपंच कमलेश बारस्कर, शामराव तलमले, नगरसेवक सचिन खरकाटे, राजेंद्र बुल्ले कोरेगाव, प्रभाकर चौधरी, महेश झरकर, लोकमान्य बरडे, गौरव नागपूरकर, सुनील पारधी यांच्यासह चारशे ओबीसी बांधव उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील ओबीसीचे कपात झालेले आरक्षण व अन्य प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. आजवरच्या राजकीय पक्षांनी ओबीसींच्या प्रश्नाचे केवळ राजकारण करीत या प्रवर्गावर सातत्याने अन्याय केला. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्‍वासनही हवेतच विरले आहे. त्यामुळे आता सगळे पक्ष एकाच माळेचे मणी असून, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात असलेल्या ओबीसींनी एकत्र येऊन वेगळाच राजकीय पर्याय निवडावा लागेल, असा सूर चर्चेदरम्यान निघाला.
ओबीसी प्र्वगाच्या प्रश्नांसंबंधी समाजात जागृती व्हावी, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गावोगावी जनजागृती सभा घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
विविध पक्षांतील ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची दाहकता आपापल्या पक्षनेत्यांच्या लक्षात आणून द्यावी. त्यांनी प्रश्न सोडविला नाही, तर सर्व पक्षातील ओबीसी पदाधिकार्‍यांनी गावपातळीपासून सामूहिक राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, यावरही बैठकीत विचारमंथन झाली. लवकरच जिल्हा स्तरावर अशी बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विष्णू दुनेदार यांनी मानले.नरोटी