मुख्य बातम्या:

‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण

वाशिम, दि. १६ :  नाबार्डच्यावतीने बचत गटातील महिला सदस्यांसाठी १२ ऑक्टोंबर २०१८ रोजी भारतीय स्टेट बँक- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था येथे एक दिवशीय नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बँकेच्या वाशिम शाखेचे मुख्य व्यवस्थापक स्वप्नील देशमुख होते.यावेळी आरसेटीचे संचालक रघुनाथ निपाने, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या वाशिम शाखेचे शाखा व्यवस्थापक आशुतोष कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री. मालोकार, युको बँकेचे शाखा व्यवस्थापक अशोक कुमार, आयडीबीआयचे शाखा व्यवस्थापक उदय बुरवे, आरसेटीचे आशिष राऊत यांच्यासह वाशिम तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या सुमारे ६६ महिला सदस्य उपस्थित होत्या.

यावेळी श्री.  खंडरे यांनी महिला बचत गटांना बँकेसंबंधी येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यावर उपाय याबद्दल मार्गदर्शन करून महिलांनी खर्च व बचत यांचा मेळ कसा घालावा, त्याचबरोबर महिलांनी सुद्धा डिजिटल व्यवहारांची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच वेगवेगळ्या प्रेझेन्टेशन आणि चित्रफीत दाखवून मार्गदर्शन केले.श्री. निपाने यांनी भारतीय स्टेट बँक-आरसेटीमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची व उपलब्ध सुविधांची माहिती दिली. तर आशिष राऊत यांनी चित्रफीतद्वारे आरसेटी कार्यपद्धती आणि उद्देश स्पष्ट केले.श्री. नागपुरे यांनी माविम अंतर्गत बचत गटद्वारा आयोजित होणारे विविध उपक्रम आणि योजनाबद्दल माहिती दिली.

श्री. देशमुख यांनी वेगवेगळ्या उदाहरणावरून स्वयंसहाय्यता समूह आणि बँक या मध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण कशाप्रकारे करता येईल, याबद्दल मार्गदर्शन करून प्रत्येक समूहाने बँकिंग नियमाची पूर्तता करून प्रगत समूह म्हणून उदयास यावे, असे आवाहन केले.सर्व उपस्थित बँक अधिकाऱ्यांनी स्वयंसहाय्यता समूहांकरिता बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती देऊन स्वयंसहाय्यता समूह आणि बँक यांच्यामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी बद्दल उपाययोजना सुद्धा स्पष्ट केल्या. स्वयंसहाय्यता समूहांतर्गत होत असलेली थकबाकी कशी कमी करता येईल व याबाबत स्वयंसहाय्यता समूहांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार आरसेटी सहाय्यक आशिष राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश चव्हाण, महेंद्र सम्रत यांनी परिश्रम घेतले.

Share