बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी गोंदिया शिवसेनेची मोर्चेबांधणी

0
8
गोंदिया,दि.१७: लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून सर्कलनिहाय बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू  केल्याचे दिसत आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघाला आपले प्रमुख लक्ष्य केले असून या मतदारसंघात पहिल्यांदाच ३६० बुथ पैकी ३६० बुथप्रमुखांची नियुक्ती केली आहे.विशेष म्हणजे गोंदिया शहरात ९० च्यावर बुथप्रमुखांची नेमणुक करुन समित्या स्थापन केलेल्या आहेत.
आजवर कागदोपत्री नियुक्ती असणाèया जि.प. तथा पंचायत समिती सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुखांपासून ते थेट विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांपर्यंतचा ‘बॅकलॉगङ्क भरून काढण्यासठी शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची चांगलीच कामाला लागली आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे,पुर्व विदर्भ प्रमुख खासदार गजानन किर्तीकार, गोंदिया-भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात बुथ समित्या तयार करण्याची मोहीम सुरु झालेली आहे.निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शिवसैनिकांच्या होणाèया नियुक्त्या मतांचा अनुशेष भरून काढतील का, याकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्रासह राज्यात भाजपासोबत सत्तास्थानी असणाèया शिवसेनेमुळे भाजपाची कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे. कर्जमाफी तसेच महामागाईच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजप विरोधात रान पेटविले आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना कामाला लावले आहे.पुर्व विदर्भाची धुरा सांभाळणारे शिवसेना संपर्क प्रमुख तथा खा. विनायक राऊत यांनी जिल्हा पातळीवर पक्षाची पुनर्रचना करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.राऊत यांनी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केल्यानंतर जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांना संघटन बांधणीचे निर्देश दिले. पक्षातील जुन्या जाणत्या व निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन जिल्हाप्रमुख शिवहरे यांनी जि.प. तसेच पंचायत समिती सर्कल प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. ग्रामीण भागात ठिकठिकाणी सेनेच्या शाखा उघडण्यात आल्याचे चित्र दिसून आले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून संपर्क प्रमुखांनी बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या करून त्यांच्यासह विभाग प्रमुखांवर मतदारांची जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. ‘बुथ प्रमुखङ्क या पदावर नियुक्त करण्यासाठी शिवसैनिकांसह नव्या युवकांनाही पक्षात प्रवेश दिला जाऊ लागला आहे.
जिल्हापातळीवर विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या झाल्या असून, उपशाखा प्रमुख, बुथ प्रमुख व गटप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. यंदा प्रथमच एका उपशाखा प्रमुखाला किमान दोनशे ते अडीचशे मतदारांची जबाबदारी सोपविल्या जाणार आहे. सेनेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.