दसर्‍यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार..मुख्यमंत्र्यांचे सोलापुरात वक्तव्य

0
5

सोलापूर,दि.17-

निवडणुका जवळ आल्याने भाजप नेतृत्वाने मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेतला आहे. चांगले काम करणाऱ्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये संधी दिली जाणार आहे. त्यात सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहनमंत्री विजयकुमार देशमुख यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. तशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे. हाच धागा पकडून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, खडसेंचा समावेश होणार का? असा पुढील प्रश्न विचारल्यावर मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते योग्यवेळी सांगू, असे म्हणत त्या प्रश्नाला बगल दिली. राज्यात आगामी निवडणुकीची गणिते घालून राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.

दुष्काळासह विविध विकास योजनांवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बंदद्वार अधिकार्‍यांशी चर्चा केली.दरम्यान, सोलापूर विमानतळाकडे मुख्यमंत्र्यांचा जाणारा ताफा अडवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार्‍या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखल्याने या कार्यकर्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात निदर्शने केली. मराठा, धनगर, मुस्लीम व कोळी समाजास तातडीने आरक्षण द्यावे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करावी, घरपोच दारू विकण्याचा निर्णय रद्द करावा, अशा मागण्या हे कार्यकर्ते करत होते.