पोलिस हवालदाराला अटक;युवकाला सोडण्यासाठी पाच हजारांची मागितली लाच

0
9

भंडारा,दि.१८ःःअटक केलेल्या युवकाला सोडून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या पोलिस हवालदाराला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.१७) अटक केली. दिलीप र्शावण गायधने (४७) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. यातील तक्रारदाराच्या मुलाच्या मित्रावर दि. ३ सप्टेंबर २0१८ रोजी पोलिस स्टेशन भंडारा अंतर्गत कलम ११0, ११२ व ११७ बी. पी. अँक्ट अन्वये कारवाई करण्यात आली होती. सदर कारवाई केल्यानंतर युवकाला सोडून देण्याची विनंती केली असता पोलिस हवालदार दिलीप गायधने याने तक्रारदार व त्यांचे मित्रास ५ हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा यापुढे त्रास होईल, अशी धमकी दिली होती. याबाबतची तक्र ार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. सापळा पडताळणी दरम्यान लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने पोलिस हवालदार दिलीप गायधने याला बुधवारी पोलिस ठाण्यातून अटक करण्यात आली. त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, प्रतापराव भोसले, सहाय्यक फौजदार गणेश पडवार, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, पोलिस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, रविंद्र गभने, अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, दिनेश धार्मिक यांनी केली.