धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा दीक्षाभूमीवर

0
20

नागपूर दि.१८:: माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारा धर्म नाकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ रोजी समता, करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी लाखो बौद्ध उपासक दरवर्षी दीक्षाभूमीवर येऊन समतेचा जागर करतात. त्याची आठवण म्हणून गुरुवार, १८ ऑक्टोबर रोजी ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल.धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण सायंकाळी ५ वाजेपासून दूरदर्शनसह लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया आणि यूसीएन या नागपुरातील वाहिन्यांवरून होणार आहे

 माणसा-माणसातील उचित व्यवहाराचे आचरणशील प्रतीक मानल्या जाणाऱ्या पंचशील ध्वज आकर्षण ठरत आहे. दीक्षाभूमीचा परिसर निळ्या झेंडय़ांनी फुलून गेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील..