यूपी आणि उत्तराखंडचे माजी मुख्‍यमंत्री एनडी तिवारी यांचे निधन

0
9

नवी दिल्ली, काँग्रेसचे ज्येष्‍ठ नेते एनडी तिवारी यांचे गुरुवारी दिल्लीतील साकेत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. तिवारी यांनी वाढदिवशीच जगाचा निरोप घेतला. 1925 मध्ये आजच्या दिवशी तिवारी यांचा जन्म झाला होता.

एनडी तिवारी हे दोन राज्यांचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे देशातील एकमेव नेते होते. तिवारी यांनी 1976-77, 1984-85, 1988-89 या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. नंतर 2002-2007 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2007 ते 2009 दरम्यान ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते.

तिवारी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी नैनीतालमधील बलौटी गावात झाला होता. अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्र विषयात उच्चशिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले होते. 1947 मध्ये अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी तिवारी यांची निवड झाली होती. 1947 ते 1949 या काळात त्यांनी ऑल इंडिया स्टूडेंट काँग्रेसचे सचिवपद भूषविले होते.

वयाच्या 88 वर्षी उज्ज्वला यांच्याशी विवाह…
एनडी तिवारी यांनी 1954 मध्ये सुशीला तिवारी यांच्याशी विवाह केला होता. 14 मे 2014 रोजी त्यांनी उज्ज्वला तिवारी यांच्याशीही विवाह केला होते. तेव्हा तिवारी हे 88 वर्षांचे होते. एनडी तिवारी यांच्यापासून उज्ज्वला यांना एक मुलगा आहे. रोहित शेखर असे त्याचे नाव आहे.