रावण दहन कार्यक्रम बघणा-या लोकांना दोन रेल्वेनी चिरडले, 70 लोक ठार तर 142 जखमी

0
12
अमृतसर,दि.20(वृत्तसंस्था) – शहरातील दसरा महोत्सवावर काळाने घाला घातला आहे. जोडा येथील रावणदहन कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकांना भरधाव जाणाऱ्या एक्सप्रेससह रेल्वेने चिरडले. यात 70 लोक ठार झाल्याची झाल्याची माहिती मिळतेय. तर प्रत्यक्षदर्शींनी मृतांचा आकडा 200 पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही. अमृतसरच्या जोडा बाजार येथील रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ही एक्सप्रेस रेल्वे पठाणकोटहून अमृतसरकडे येत होती. दरम्यान दुसऱ्या बाजुने येणाऱ्या आणखी एका डीएमयूनेही काही जणांना उडवल्याची माहिती मिळतेय. रावण दहनाचा कार्यक्रम रेल्वे पटरी जवळ होत होता. फटाक्यांच्या आवाजामुळे रेल्वेचा आवाज दबला गेला आणि लोक रेल्वेखाली चिरडले गेले. या घटनेचा शोक व्यक्त करत आज शहरातील शाळा कॉलेजांना सुट्या देण्यात आलेल्या आहेत. अमृतसर रेल्वे प्रशासनाने 0183- 2223171 आणि 0183-2564485 हे हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.

दोन्ही रेल्वे एकाचवेळी समोरासमोर आल्या, समोर आलेला व्हिडिओ एक्सप्रेसचा 
अपघात अमृतसर-दिल्ली रेल्वे रूटच्या ट्रॅकवर झाला. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, रावण दहन कार्यक्रमादरम्यान एकाच वेळी दोन रेल्वे दोन रुळांवर विरुद्ध बाजुंनी आल्या. एक एक्सप्रेस ट्रेन होती, तिचा वेग ताशी 100 किमी च्या जवळपास होता. याच ट्रेनने लोकांना चिरडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अपघात झालेल्या स्थळावरून 5 सेकंदांपेक्षा कमी वेळात रेल्वे गेली. दुसरी रेल्वे डीएमयू होती, तिचा वेग 60 ते 80 दरम्यान होता.

अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. रेल्वेने कोणताही हॉर्न वाजवला नाही हॉर्न वाजवला असता तर लोक बाजुला सरकले असते. दरवर्षी याठिकाणी कार्यक्रम होत असताना रेल्वेने नियोजन का केले नाही, असा प्रश्न लोक विचारत होते. एका प्रत्यक्षदर्शीने तर अपघातात 200 ते 250 ठार झाल्याचे डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे.

मोदींनी दिले मदतीचे निर्देश
अमृतसर रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अपघातात अनेकांनी स्वकीयांना गमावले आहे. त्याबाबत मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांना गरजेनुसार मदतीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकांना मागे हटण्याची संधीच मिळाली नाही 
दोन्ही रेल्वे जोडा बाजार रेल्वे फाटकाजवळ पोहोचल्या तेव्हा रावण दहनचा व्हिडिओ तयार करणाऱ्या काही लोकांना काही समजायला किंवा मागे हटायला संधीच मिळाली नाही. अमृतसरचे पोलिस आयुक्त आयुक्त एसएस श्रीवास्तव यांनी सांगितले की, मृतांची संख्या 50 हून अधिक आहे.

सीएम कॅप्टन अमरिंदर म्हणाले..

दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या अपघाताने धक्का बसला असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर म्हणाले. प्रशासनाला युद्धपातळी मदतकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयांनाही सज्ज राहण्याचे निर्णयही देण्यात आले आहेत, असे अमरिंदर म्हणाले. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची नुकसान भरपाईही जाहीर केली आहे.