नरभक्षक वाघिणीने घेतला शेतकर्‍याचा बळी

0
7

अमरावती,दि.21ः- शेतात सायंकाळी गेलेल्या एका शेतकर्‍याची वाघिणीच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून पोलिसांना केवळ मृत शेतकर्‍याचे मुंडके मिळाले आहे. अर्धे गाव शेतशिवारात रात्री उशिरापर्यत त्याचा शोध घेत होते. ही घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे रात्री १0 वाजताच्या सुमारास उघड झाली. राजेंद्र देविदास निमकर (४८) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
गावापासून आठ किलोमीटर अंतरावर राजेंद्र यांचे शेत आहे. सायंकाळी ते शेतात गेले असता रात्र होऊनही परत न आल्यामुळे राजेंद्रचे चुलतभाऊ जि.प. सदस्य सुरेश निमकर हे त्यांना शोधण्यासाठी गेले. मात्र, शेतात राजेंद्रचे अंतर्वस्त्र दिसले. काही अंतरावर केवळ मुंडके दिसले. देवळी भागात वाघ आल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. शुक्रवारी वाघिणीने शेतकर्‍याची शिकार केल्याने अर्धे गाव शेतशिवारात दाखल झाले होते. मंगरूळ दस्तगीरचे पोलिस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी माहिती दिली की, राजेंद्र निमकर यांचे केवळ मुंडके आम्हाला मिळाले. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिया कोकाटे घटनास्थळी रवाना झाले. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान निमकर यांचे धड वनविभागाच्या हाती लागले. रात्री उशिरापयर्ंत वनविभागाची मोहीम सुरू असताना वाघ हा भुकेल्या अवस्थेत असल्याने त्याने ही शिकार केली असावी, अशी प्रतिक्रिया सहायक वन संरक्षक अशोक कविटकर यांनी दिली आहे.