मुख्य बातम्या:

पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी

गोंदिया दि.२१:: साधारणत: सप्टेंबर महिन्यात धान फुलोऱ्यावर येतो. परंतू अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात २५ टक्केच पाऊस झाल्यामुळे व २२ दिवसाचा पावसाचा खंड पडल्यामुळे तालुक्यात टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होवून तालुक्यात टीगर-२ लागू झाले आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी २० ऑक्टोंबरला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चान्ना/कोडका, खांबी/पिंपळगाव, भागी/रिठी व धाबेटेकडी/आदर्श या गावाला भेटी देवून शेतकऱ्यांच्या धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पालकमंत्र्यांसमवेत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, तहसिलदार धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, जि.प.सदस्य रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे उपस्थित होते.
हाती येत असलेल्या धान पिकाला ऐनवेळी पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी हा दौरा करुन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली व याबाबत शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतपिकाचे योग्य ते सर्वेक्षण करुन शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले.

Share