पाटील यांचा ताफा अडवणाऱ्यांवर कारवाई करा

0
21

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी
नांदेड,  दि. ३१ :अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय झाला. याबाबत नगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याची बाब न्यायप्रविष्ट असतानासुध्दा काल औरंगाबाद येथे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा जाणीवपूर्वक अडवून त्यांना राजकीय हेतूने त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
काल विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील औरगाबाद व जालना जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाहणी करण्यासाठी आले असताना काही राजकीय हेतूने विखे पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याला पाणी देण्यास त्यांनी कधीच विरोध केला नाही. यापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले आहे. केवळ राजकीय हेतूने विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनाच लक्ष करून जाणीवपूर्वक त्रास दिला जाणार असेल, तर या विरोधात मराठवाड्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची कार्यकर्ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील. गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करावेत. विखे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भागवत देवसरकर यांनी केली आहे.
या निवेदनावर प्रदेश सचिव प्रा.विवेक सुकणे, चक्रधर पाटील, विनीत पाटील, परभणी जिल्हाध्यक्ष एकनाथ मोरे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार, रामदास माळेगावे, हिंगोली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील वाघमारे, लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.अरुण महालूगकर, परमेश्वर काळे, संदीप जाधव, दीपक पवार, मोतीराम पवार यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.