नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा, मोदींचे आवाहन

0
8

जगदलपूर(वृत्तसंस्था)दि.09ः- छत्तीसगढ राज्य विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसला लक्ष्य केले. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार भाजपा देशात काम करत आहे. समाजातील सर्वच घटकांचा विकास करणे भाजपाचे ध्येय आहे. देशात माझा-तुझा असा खेळ अजिबात चालणार नाही, असे मोदींनी जगदलपूर येथील भाषणात म्हटले. तसेच यापूर्वीचं सरकार जातीपातीचे राजकारण करत होते. तसेच नक्षली कारवायांचे समर्थन करणाऱ्या क्राँग्रेसला धडा शिकवा, असे आवाहनही मोदींनी केलं आहे.

छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगदलपूर येथे जनतेला संबोधित केले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमनसिंग यांच्यासह भाजपा नेते व्यासपीठावर उपस्थित होते. येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस पक्ष नेहमीच दलित, पीडित, शोषित, वंचित आणि गरिबांना आपली वोट बँक मानते. या वर्गाकडे माणूस म्हणून काँग्रेस कधीच पाहात नसल्याचा आरोपही मोदींनी केला. याउलट भाजपा सरकार नेहमीच जनतेच्या पाठीशी आहे. आम्ही आपला-परका, जातीभेद, हिंदू-मुस्ली, जवान-वृद्ध असा भेदभाव कधीही केला नाही. तर, सर्वांना सोबत घेऊनच आम्हाला विकास घडवायचा असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांवरही मोदींनी भाष्य केलं.
शहरी नक्षलवादी लोक स्वत: आरामदायी जीवन जगतात. मात्र, गरिब आणि आदिवासी लोकांच्या हातात बंदुक देऊन आपला स्वार्थ साधतात, असे मोदींनी सांगितले. तसेच नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराची निर्घृण हत्या केली. तो पत्रकार तर त्याचे काम करण्यासाठी आला होता, पण नक्षलींनी त्याला ठार मारले. मात्र, काँग्रेसकडून अशा नक्षलवाद्यांच समर्थन करण्यात येतं. या नक्षलवाद्यांना काँग्रेस क्रांतिकारी म्हणते, असा आरोपही मोदींनी केला आहे.