दवडीपार निवासी पोल्ट्री व्यवसायिकावर धारदार शस्त्राने वार

0
12

गोरेगाव,दि.11ः- गोरेगाव तालुक्यातील दवडीपार निवासी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पोल्ट्री व्यवसायिक माणिकलाल शोभेलाल कटरे यांच्यावर शनिवारच्या (दि.10)रात्री 8 ते 10 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमानी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना आज रविवारला(दि.11) पहाटे पाच वाजेच्या हिरडामाली-मोहगाव(बु.)दरम्यानच्या नाल्याजवळ सुमारास उघडकीस आली.याप्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माणिक कटरे हे शनिवारला सायकांळी 7 वाजेच्या सुमारास गोरेगाव येथील बाजार समिती परिसरात असलेल्या आपल्या पोल्ट्रीदुकानातून काम आटोपून घरी जाण्यासाठी निघालेले होते.परंतु रात्री 9 वाजेपर्यंत गावात न पोचल्याने शोधाशोध सुरु करण्यात आली.गोरेगाव येथेही रात्रीला शोध घेण्यात आला परंतु काहीही शोध लागला नाही.त्यातच गावात दिवाळीनिमित्त मनोरंजनासाठी 3 अंकी ड्राम्याचे आयोजन करण्यात आले होते.पहाटेला ड्रामा संपताच परत गावातीलच राध्येशाम सोनवाने व गिरधारी कटरे हे माणिकलाल कटरेच्या शोधासाठी दुचाकी वाहनाने निघाले.त्यांनी तुमखेडा (बु.) येथे नाटक असल्याने त्याठिकाणी पाहणी केली असता त्यांना तिथेही आले नसल्याचे कळल्यानंतर ते हिरडामाली मार्गे दवडीपारला येण्यासाठी निघाले असता हिरडामाली ते मोहगावच्या दरम्यान असलेल्या पांगोली नदीवरील पुलाच्या काही अंतरवार कटरे यांची दुचाकी दिसून आली.तेव्हा त्या दुचाकीकडे गेले असता दुचाकीपासून 50 मीटरच्या अंतरावर माणिक कटरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच त्यांनी लगेच 108 रुग्णवाहिकेला बोलावले तसेच गावात निरोप दिला.कटरे यांच्या  डोक्यावर धारदार शस्त्राने तीन ते चार वार करण्यात आले असून त्यांना गोंदियातील डाॅ.बजाज यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अज्ञात आरोपींनी कटरे यांच्या डोक्यावर वार केल्यानंतर रक्ताचा स्त्राव बघून खाली पडल्यावर मृत झाल्याचे गृहीत धरुन पळ काढला असावा असा अंदाज आहे.विशेष म्हणजे आरोपींनी कटरे यांच्या खिशात असलेल्या रक्कमेला मात्र हात लावलेला नसल्याने लुटपाट करण्यासाठी नव्हे तर आपसी वादातून कुणीतरी हल्ला केला असावा अशी शंका वर्तविली जात आहे.सोबतच घटनेच्या रात्रीला गोंदिया मार्गावर हिरडामाली येथील पापुलर पोल्ट्रीफार्मजवळ सायकांळी 8 च्या सुमारास माणिक कटरेला दोघांव्यक्तिसोबत बघितल्याची चर्चा मोहगाव (बु.)येथील काही नागरिकामध्ये सुध्दा होती.