खडकाळ जमिनीत पुजारी दाम्पत्यांनी फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती

0
77

पांडोझरीच्या पुजारी दांपत्याची किमया;उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे व विलास चिकुर्डेकर यांनी केलेली चर्चा

सांगली,दि.11ः- जिल्ह्यातील जत तालुक्यातील पांडोझरी येथील कल्लप्पा पुजारी व गायञी पुजारी दांपत्याने कमी पाण्यावर द्राक्ष व डाळिंबाला उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकणार्‍या ड्रॅगन फ्रुटचे पीक घेऊन दुष्काळी पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

पांडोझरी हे महाराष्ट्र व कर्नाटक च्या सीमेवरील गाव आहे. या गावात कल्लप्पा व त्यांची पत्नी गायत्री पुजारी गेली अनेक वर्षे झाले पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. मात्र निसर्गाने तालुक्यावर नेहमी केलेल्या अवकृपेमुळे शेतीसाठी पाण्याची नेहमी असणारी कमतरता लक्षात घेऊन त्यांनी कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न देणारे पीक कोणते याची माहिती घेतली. त्यावर पिलीव (तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर )येथील जाधव यांनी ड्रॅगन फुट्स लावल्याचे कळताच. पती ,पत्नी व त्यांचा मुलगा श्रीनिवास यांनी त्या शेतीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर आपल्या शेतीमध्ये हे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

पांडोझरी गावाजवळच पुजारी दांपत्याची शेती आहे. खडकाळ असलेल्या जमिनीत मटकी व तुरीचे पीकही येत नाही, अशी सव्वा एकर एक जमीन त्यांनी निवडली. पन्नास रुपयेला एक याप्रमाणे दोन हजार रुपयांचे ड्रगन फ्रुट झाडांची खरेदी केली. यासाठी पाचशे सिमेंटचे खांब उभे केले.जुलै महिन्यात या रोपांची लागवड करुन ठिंबक सिंचन पाईपच्या माध्यमातून शेणखत व आठवड्यातून एकदा पाणी देण्यास सुरुवात केली. आता आठ महीने झाली असून दीड ते दोन वर्षात ड्रॅगन फुले येण्यास सुरुवात होते. गेली तीन वर्षापासून हे शेती करीत असून पहिल्या वर्षी दीड टन फळाचे उत्पादन घेतले.पहिल्या दीड वर्षात किमान पाच ते सहा टन फळे लागतात. त्यातून वर्षाकाठी आठ ते दहा लाखाचे उत्पन्न निघते. या फळाला पुणे, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील अनेक शेतकरी या ड्रॅगन फळाच्या पिकाकडे वळले आहेत.

आरोग्यासाठी उपयुक्त

ड्रॅगन फुट्स हे सर्व फळांमध्ये अतिशय आरोग्यवर्धक फळ आहे. हाडांच्या मजबुतीसाठी शरीरात कायम फॉस्फरस लागतोय यासाठी या फळाचा उपयोग होतो. मधुमेह झालेल्या व्यक्तीने हे फळ खाल्ल्यानंतर साखरेचे प्रमाण नियमित होते. त्यामुळे मोठ मोठ्या शहरात या फळासाठी मोठी मागणी असून या फळामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे ही मिळणार आहेत.

जत तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी होते. दरवर्षी तालुक्यातील अनेक गावात तलाव कोरडे पडतात व बोअर मधील पाणी संपूर्ण आटते. त्यावेळी पिके जगवणे ही अवघड होते. यासाठी ड्रॅगन फुड्स हे फळ दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. या दिवसात या पिकाला पाणी कमी लागते एक महिनाभर या पिकाला पाणी दिले नाही तरी चालू शकते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अगोदरच पाणी कमी असते त्याचा फायदा आम्हाला उन्हाळ्यात होतो असे गायत्री पुजारी यांनी दिलीप वाघमारे व विलास चिकुर्डेकर यांच्याशी चर्चा करतांना सांगितले. ड्रॅगन फ्रुट या पिकासाठी सर्वात निकृष्ट दर्जाची पडीक व माळरान जमिनीची निवड केली असली तरी या ठिकाणी चांगल्या पध्दतीने ही झाडे जगली आहेत. पुजारी यांच्या ड्रगनशेतीला बघण्यासाठी अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.पुजारी दाम्पत्याला खडकाळ व पडीक शेतीमध्ये कमी पावसात ड्रगन फळाची शेती करुन चागंले उत्पादन घेतल्याबद्दल  महाराष्ट्र सिंचन सहयोगच्या चौदाव्या सिंचन परिषदेत पुरस्कारही मिळालेला आहे.