छत्र हिरावलेल्यां अनाथ 42 बालकांना कपड्यांचे वाटप

0
22

अर्जुनी मोरगाव,दि.12ः- वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. दिवाळी म्हणजे एक नव पर्व. घरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. त्यातही बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. नव्या क्षितीजाप्रमाणे घरात नवचैतन्य उजळून येते.फटाक्याची आतषबाजी, नव्या कपड्याची नवलाई, गोड गोड धोड पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र हे सर्व केवळ ज्यांचे आई वडील आहेत त्याच मुलांना मिळते. परंतु आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या अनाथ बालकांना सुद्धा या सर्व गोष्टींचा आनंद मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी पुढाकार घेवून अनाथ बालकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.
जिल्ह्यातल अर्जुनी मोरगाव तालुक्यासह अन्य ठिकाणच्या ४२ अनाथ वंचित गरीब मुलांना वेळोवेळी अन्नधान्यासह किराणा सामान, शालेय साहित्य व इतर आवश्यक वस्तुंचा पुरवठा अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाºया प्रा. बेदरकर वेळोवेळी दानदात्यांच्या सहकार्यानी करीत असतात. ज्या वंचितांचे मायबापच दृष्ट काळाने एकाएकी हिरावून नेल्याने त्या कुटुंबावर मोठा आघात होऊन जन्मदात्याविना त्या मुलांची वाताहात होते. दु:ख सावरता येत नाही. दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे, फटाके, मिठाई कोण देणार असे नानाविध प्रश्न निर्माण होतात. ईतर मुलांप्रमाणे अनाथ मुलांची दिवाळी आनंदाची जावी, त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे या हेतूने गोंदिया शहरातील विविध दानशुरांच्या मदतीने बेदरकर मागील काही वर्षापासून आपल्याच निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुलांचा दिवाळी मनोमिलनाचा एक अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. नुकताच हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला. या वेळी अनाथ बालकांना नवीन कपडे, मिठाई व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. अनाथ मुलांचे दिवाळी मनोमिलन या अभूतपूर्व सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा मांडोदेवी देवस्थानचे सचिव विनोद अग्रवाल, आरती चवारे, समाजशिल शिक्षक अनिल मेश्राम, सृजन सामाजिक संस्थेचे विजय ठवरे, वशिष्ठ खोब्रागडे, वरुण खंगार, प्रणाली ठवरे, पूजा खंगार, त्रिशा खंगार, सुनिता खोब्रागडे, देवानंद भांडारकर, पंकज दियेवार, निखील खंगार उपस्थित होते.