दोन हजारांची लाच स्वीकारणारा हवालदार एसीबीच्या जाळय़ात

0
11

गडचिरोली,दि.१९ः-दारुच्या गुन्ह्यातील आरोपीवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना कोणताही त्रास न देण्याचा मोबदला म्हणून दारू विक्रेत्यांकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवार (दि. १७) देसाईगंज पोलिस ठाण्यातील हवालदार नेताजी भाऊजी मडावी (५३) यास रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा देसाईगंज येथील रहिवासी असून, त्याच्याविरुद्ध देसाईगंज पोलिस ठाण्यात मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, या गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना कोणताही त्रास न देण्याचा मोबदला म्हणून हवालदार नेताजी मडावी याने तक्रारकर्त्याला ५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो २ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकार्‍यांनी काल रात्री देसाईगंज पोलिस ठाणे परिसरात सापळा रचला असता, हवालदार नेताजी मडावी यास तक्रारकर्त्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यामुळे एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(अ) अन्वये देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र दुधलवार, राजेंद्र नागरे, विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्‍वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तावाडे यांनी केली. १८ नोव्हेंबर रोजी आरोपी नेताजी मडावी याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १९ नोव्हेंबरपर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.