इंडियन रोड कांग्रेसच्या 79व्या अधिवेशनाचे थाटात उद्घाटन

0
11

नागपूर, दि.23 : बांधकामाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर झपाटयाने बदल होत आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक, अद्ययावत, शाश्वत, स्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याचे आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्विकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे 79 व्या इंडियन रोड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ.अनिल सोले, विकास कुंभारे, गोव्याचे बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर, कर्नाटकचे बांधकाम मंत्री एच.डी. रेवण्णा, केंद्रीय रस्ते, परिवहन व राजमार्ग सचिव युद्धवीर सिंह मलिक, बी. एन. सिंह, इंडियन रोड कांग्रेसचे अध्यक्ष कृष्णा रेड्डी, सचिव निर्मलकुमार, माजी अध्यक्ष एन. के. प्रधान, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, अजित सगने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता रमेश होतवाणी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.
यावेळी रस्तेबांधणी व रस्ते विकासाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या अभियंत्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘आयआरसी’मधील विविध पुस्तकांचे यावेळी विमोचन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या उभारणीमध्ये रस्ते बांधणीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती आणि परंपरांनाही रस्ते जोडतात. रस्त्यांच्या माध्यमातून व्यापार-उदीम वाढीस लागतो. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज झपाट्याने बदल होत असून यापुढील काळात अभियंत्यांना ‘आर्टीफिशियल इंटीलिजन्स’ शी स्पर्धा करावी लागणार आहे. रस्ते बांधणीच्या क्षेत्रातही याबाबत विचार करावा लागेल. रस्ते बांधणीच्या क्षेत्रामध्ये ‘डिपीआर’ची भूमिका अत्यंत महत्वाची असते. यामध्येही आता ड्रोनसारखे नवे तंत्रज्ञान व विचारप्रवाह स्विकारले पाहिजेत. इंडियन रोड काँग्रेसचे नागपूर येथील आयोजन गौरवास्पद असून या परिषदेतील विचारमंथनातून पुढे आलेले संशोधन सर्वांपर्यंत पोहचले पाहिजेत. आधुनिक, शाश्वत व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर दिला पाहिजे. नविन तंत्रज्ञान स्विकारतांनाच त्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाची किंमतही कमी
झाली पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. देशात आणि राज्यात पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येत असून राष्ट्रीय महामार्गांमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. 30 हजार किलोमिटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गतचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. यामधील 22 हजार किलोमिटरच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली असून 10 हजार किलोमिटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सर्वाथाने अद्ययावत, आधुनिक व शाश्वत विकासाचा पाया ठरणार आहे. या रस्त्यावरील विविध 22 ‘नोड्स’द्वारे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. राज्यातील 24 जिल्हे या महामार्गाद्वारे ‘जेएनपीटी’शी जोडले जातील. मुंबई ते नवीमुंबई यादरम्यान 22 किलोमिटरचा सी-लींक तयार करण्यात येत आहे. यापूर्वी वरळी ते बांद्रा या दरम्यान सी-लींक तयार करण्यात आला. याशिवाय वर्सोवा, नरीमन पॉईंट ते वरळी या भागानांही एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. वर्सोवा ते विरार कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात येत आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशामध्ये रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर असून दर्जेदार व कमी खर्चातील रस्तेबांधणीवर विशेष भर देण्यात येत आहे. इंडियन रोड काँग्रेसचे नागपूर येथील आयोजन नागपूरकरांसाठी गौरवास्पद ठरले असून ही परिषद वैशिष्ट्यपूर्ण आहे. रस्ते बांधणीच्या क्षेत्रातील विविध पैलूंवर यामध्ये विचारमंथन होणार असून यामध्ये सादर करण्यात आलेल्या संशोधनांचा निश्चितच उपयोग होणार आहे. रस्तेबांधणीच्या क्षेत्रात नवीन संशोधनामध्ये रस्ते बांधकामासाठी प्लॅस्टीक, काच व अन्य काही टाकाऊ वस्तूंचा उपयोग करुन घेण्यात येत आहे. रस्तेबांधणीत अनेकवेळा अपरिहार्यपणे झाडे कापावी लागतात. परंतु त्याहून अधिक वृक्ष लागवड करणे व झाडांचे पुनर्स्थापन करणे यावर भर द्यावा लागेल.
जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाच्या विविध कामातून निघालेल्या मुरुम आणि मातीचा रस्तेबांधणीसाठी उपयोग करुन घेण्यात येत आहे. रस्तेबांधणीबरोबरच रस्ते सुरक्षितता हा देखील महत्वाचा विषय असून दरवर्षी देशभरात अपघातात मोठ्या संख्येने बळी जातात. हे कमी करण्यासाठी संवेदनशिलतेने विचार करण्याची आवश्यकता असून अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्र व जागा कमी करणे यासारख्या विविध उपाययोजना कराव्यात. रस्तेबांधणी व रस्ते विकासाच्या क्षेत्रामध्ये ‘आयआरसी’ आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था म्हणून उदयास येऊन रस्ते विकासात ती मानबिंदू ठरावी. रस्तेबांधणीच्या क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा स्विकार करुन परिपूर्ण नियोजनाद्वारे पारदर्शक, कालबद्ध व वेगवानपणे कामे करावी, असे आवाहनही श्री.गडकरी यांनी यावेळी केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, रस्ते विकासांच्या विविध मुद्यांवर ‘आयआरसी’मध्ये मंथन होणार असून या परिषदेचे आयोजन गौरवास्पद आहे. राज्याचे रस्ते विकासाचे चित्र आता पालटले आहे. रस्तेबांधणीमध्ये राज्यात विविध नविन प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ई-टेंडरींगच्या प्रक्रियाद्वारे पारदर्शकता अंमलात आणली जात आहे. रस्त्यातील खड्डे बुजविण्याच्या कामांसाठी नविन मानकांचा वापर करण्यात येत असून पर्यावरणपूरक इमारत बांधकामावर भर देण्यात येत आहे. यामध्ये सौरऊर्जेचाही वापर करण्यात येत आहे. रस्तेबांधणी व विकासाच्या क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
‘आयआरसी’चे अध्यक्ष के.एस.कृष्णा रेड्डी म्हणाले, रस्तेबांधणी व रस्ते विकासाच्या क्षेत्रात ‘आयआरसी’चे योगदान मोलाचे असून शाश्वत विकासावर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘आयआरसी’ प्रयत्नशील असते. रस्ते बांधणीच्या क्षेत्रातील संशोधनावर ‘आयआरसी’ विशेष भर देत असून देशातील महामार्ग बांधणीत लक्षणीय सुधारणा होत आहे. पर्यावरणपूरक रस्ते बांधणीद्वारे रस्त्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यात येत आहे. रस्ते विकासाच्या क्षेत्रात मोठे प्रकल्प सध्या देशात उभारले जात आहे. रस्ते
विकासाच्या संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. रस्तेबांधणीबरोबरच रस्ते सुरक्षिततेचाही ‘आयआरसी’ साकल्याने विचार करत असून यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात येत आहे. रस्तेसुरक्षितता या मुद्दयांबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे श्री. रेड्डी यांनी सांगितले.
सचिव युद्धवीर सिंह मलिक म्हणाले, रस्ते विकासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान वेगात बदलत असून नवनविन संशोधन पुढे येत आहे. हे संशोधन प्रत्यक्ष कामांमध्ये उतरविण्याची गरज असून यादृष्टीनेही ‘आयआरसी’ नक्कीच प्रयत्न करेल. अभियंते हे राष्ट्रनिर्माते असून नवे संशोधन व नवी कामे करण्याची संधी अभियंत्यांना मिळाली पाहिजे. रस्ते अपघातांची संख्या कमी करुन रस्ते सुरक्षितता या विषयालाही प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मलिक यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी.जोशी म्हणाले, चार दिवसीय इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात देश-विदेशातून नामांकित अभियंते सहभागी झाले आहेत. या अधिवेशनात नवनविन तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. ज्याद्वारे रस्ते बांधणी व सुरक्षितता यावर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. विषय तज्ञांच्या मार्गदर्शनात नवनविन अभ्यासक्रम येत्या काळात उपलब्ध करुन देण्यात येतील. जेणेकरुन रस्तेबांधणी व शाश्वत विकासाची सांगड घालता येईल.
अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमच्या नुतनीकरण कामाचे उद्घाटन
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल हे खेळाडूंकरिता प्रशिक्षणाचे महत्वाचे दालन आहे. प्रशिक्षणासोबतच येथे विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमच्या नुतनीकरण कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.