खतगांवकर-गोरठेकरांत युती:काँग्रेसची झाली माती!

0
12

‘दादां’ची करणी; धर्माबाद बाजार समितीवर करखेलीकरांची वर्णी

नांदेड,दि.27ः- काँग्रेस व राष्ट्रवादीतील कुरघोडीचा राजकीय फायदा उचलीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी केवळ दोन संचालकाच्या बळावर धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे गणेशराव पाटील करखेलीकर यांची वर्णी लावण्यासाठी ‘दादां’नी आपला राजकीय मुत्सद्दीपणाचा बाणा यशस्वी करुन दाखविले. दादाची करणी धर्माबाद बाजार समितीवर भाजपाची वर्णी लागल्यामुळे भाजपाचे प्रेदशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी खतगांवकरांचे अभिनंदन केले आहे.

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपाला केवळ दोन संचालकांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला आठ तर काँग्रेसला चार जागेवर यश संपादन करता आले. शिवसेनेचा एक तर अपक्ष तीन संचालक निवडून आल्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले नाही. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत अतिशय महत्व प्राप्त झाले होते. भाजपाचे नवनिर्वाचित संचालक गणेशराव पाटील करखेलीकर हे भास्करराव पाटील खतगांवकर यांचे व्याही आहेत. करखेलीकर व गोरठेकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोध असल्यामुळे करखेलीकरांनी काँग्रेसला जवळ करण्याचा पवित्रा घेतला होता.

राष्ट्रवादीचे नेते बापुसाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक दत्ताहरी पाटील चोळाखेकर यांनी गोरठेकरांना सोडचिठ्ठी देवून काँग्रेसमध्ये उडी घेतल्यामुळे राष्ट्रवादीला हदरा बसला होता. काँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीतील फुटरतेचा राजकीय फायदा उचलण्यासाठी अपक्ष संचालकांची जुळवा-जुळव करुन बाजार समितीवर काँग्रेसचा ताबा मिळविण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. काँग्रेसेला सोड चिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेल्या गणेशराव करखेलीकर यांच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न वसंतराव चव्हाण यांनी करुन बहुमताचा आकडा गाठण्याचा अटोकाट प्रयत्न केला होता.

नायगांव विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या एका नेत्याने खतगांवकरांवर कुरघोडी करण्यासाठी भाजपाचे संचालक राजू पाटील बोळसेकर यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न करुन खतगांवकरांचा व्याही डाव यशस्वी न होण्यासाठी पडद्याआड बरेच प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. नायगांव मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर भास्करराव पाटील खतगांवकरांनी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्याशी हातमिळवणी करुन मतदारसंघातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. राष्ट्रवादीच्या पाठित खंजीर खूपसून रातोरात काँग्रेसवासी झालेल्या दत्ताहरी पाटील चोळाखेकर यांना धडा शिकविण्यासाठी गोरठेकरांनी सभापतीपदाचे ऑफर भाजपाला देवून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी खेळली. व्याही करखेलीकर यांची समजूत काढून खतगांवकरांनी भाजपाचे दोन संचालक राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत सभापतीपद भाजपाला मिळवून देण्यात खतगांवकरांनी मोलाची भूमिका बजावली आहे. गोरठेकरांनी ऐनवेळी भाजपाला सभापतीपद देवून काँग्रेसकडून सभापतीपदाचे बासिंग बांधून रिंगणात उतरलेल्या चोळाखेकर यांना पराभूत करुन त्यांना त्यांची जागा दाखविल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांत समाधान व्यक्त होत आहे.

धर्माबाद बाजार समिती सभापतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा-सेना युतीचे उमेदवार गणेशराव करखेलीकर यांना 10 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे बंडखोर व काँग्रेसचे उमेदवार सौ. गोदावरीबाई चोळाखेकर यांना 8 मते पडली. भाजपाच्या दोन मतांनी पराभूत झालेल्या चोळाखेकर यांच्यावर हात चोळीत बसण्याची वेळ आली आहे. उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र पाटील बन्नाळीकर हे काँग्रेस उमेदवार वर्णी यांचा पराभव करुन विजयी झाले आहेत. धर्माबाद मार्केट कमिटीच्या सभापती निवडणूकीत भाजपा-राष्ट्रवादीची युती आगामी नायगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत काँग्रेसला धोक्याची ठरु शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.