महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्तच-विश्वास पाठक

0
22

गोंदिया/भंडारा,दि.30 : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकºयांना आठ तास वीज पुरेशी असून त्यापेक्षा अधिक वीज दिली तर भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्तच आहे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विजेशी संबधित प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून कृषीपंपांना अटल सौर योजना व मुख्यमंत्री सौर योजनेंतर्गत जोडणी देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
गेल्या चार वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या विकास कामाचा आढावा घेत त्यांनी शासनाचा विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, भारनियमन होत असल्याची ओरड सर्वत्र आहे. परंतु शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज देण्याचा नियम आहे. त्यापेक्षा कमी वीज दिली तर भारनियमन म्हणता येईल. सध्या शेतकºयांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे त्यांच्यापुढे विविध समस्या आहेत. दिवशी वीज पुरवठा कशा केला जाईल, यावर उपाययोजना सुरु असून अटल सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीने सेंट्रलाईज बिलींग सिस्टम आणली असून २ कोटी २५ लाख ग्राहक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तर १ कोटी ४० लाख ग्राहक मोबाईलशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात गेल्या चार वर्षात 40 लाख ग्राहकांची संख्या वाढली असून 22 आॅक्टोंबर 2018 ला सर्वाधिक 24900 मेगावॅट विजेची मागणी राज्यात नोंदविण्यात आली.त्यासाठी इतर राज्यातून वीज खरेदी करण्यात आल्याचे सांगितले.सोबतच तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पाकडून खरेदी करण्यात येत असलेली वीज ही 6 ते 7 रुपये प्रती युनीट दराने होत असल्याचेही सांगत महावितरणने वीजेसाठी लागणार कोळसा चांगल्या प्रतीचा वापरण्यास सुरवात करुन कोळश्यात यापुर्वी होणारी हेराफेरीच बंद केल्याचीही माहिती दिली.

आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाणार असून ग्राहकांना ई-मेलवरच बिल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वितरणचे प्रत्येक बिलामागे दहा रुपये वाचतिल. त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक गावात व घरात वीज पोहचविली जात असून गडचिरोली व नंदूरबार जिल्हा वगळताच सर्वच गावात वीज पोहचल्याचा दावा त्यांनी केला. वीजेचे अपघात टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असून ५० वर्षावरील कर्मचाºयांच्या मदतीला हेल्पर देण्यात आले आहे. तसेच लवकरच २३ हजार ग्रामविद्युत सेवक नियुक्त केले असून त्यांचे प्रशिक्षणही टप्याटप्याने सुरु करण्यात आल्याचे सांगितले.गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक समस्यांचे निराकरण त्वरीत करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांना देत गोंदिया शहरात 10 किलोमीटरपैकी 5 किलोमीटरचे अंडरग्राऊंड केबलचे काम पुर्ण झाले असून भविष्यात अंडरग्राऊंड केबलमुळे विजचोरीवर आळा बसण्यास मदत होईल व ग्राहकांवर चोरीचा पडणारा भुर्दंडही वाचेल असे सांगितले.