नक्षल्यांनी जाळली १६ वाहने

0
13

गडचिरोली,दि.02ः रविवारपासून २ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या पीएलजीए सप्ताहाच्या दोन दिवस आधीपासून नक्षल्यांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली असून शुक्रवारीच्या रात्री एटापल्ली तालुक्यातील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील १६ वाहने जाळून टाकली. या वाहनांमध्ये १0 जेसीबी, ३ ट्रॅक्टर्स, २ मोटारसायकली व १ पिकअप वाहनाचा समावेश आहे. यात कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सशस्त्र नक्षली काम सुरू असलेल्या ठिकाणी हालेवारा गावाजळ गेले. त्यांनी मजुरांना धमकावून व बराच वेळ ओलिस ठेवून वाहनांची डिझेल टँक फोडली व नंतर वाहनांना आग लावली. मुख्यमंत्री सडक योजनेतून वट्टेपल्ली-गटेपल्ली रस्त्याचे काम सुरू असून, ग्रामसेवकपदावरून स्वेच्छानवृत्ती घेतलेल्या व अल्पावधीतच मोठा कंत्राटदार झालेल्या एका व्यक्तीच्या साळ्याचे हे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी नक्षलवादी २ ते ८ डिसेंबरपयर्ंत पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान ते विध्वंसक कारवाया करतात. यावेळी सप्ताहापूर्वीच त्यांनी १६ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकून आपली दहशत निर्माण केली आहे.
अलिकडेच जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना यास नक्षल्यांनी माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव बनविले आहे. गगन्ना हा नक्षल्यांचा मिलिटरी कमांड असल्याने हिंसाचार करण्यावर त्याचा अधिक भर आहे. त्याच्या नियुक्तीनंतर विध्वंसक कारवाया मोठय़ा प्रमाणावर होतील, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनी व्यक्त केला आहे.