लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा – डॉ.बलकवडे

0
25

जागतिक दिव्यांग दिन साजरा
गोंदिया  दि. ३ :: लोकशाही प्रणालीमध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने ‘सुलभ निवडणूका’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज दिव्यांग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभांगी आंधळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत आहे. दिव्यांग बांधव सुध्दा एक समाजाचा घटक आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
डॉ.दयानिधी म्हणाले, दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे त्यांनी सांगितले.श्री.रामटेके म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, बिज भांडवल योजना, आंतरजातीय विवाह योजना व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा दिव्यांग बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून श्रीमती आंधळे म्हणाल्या, आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये दिव्यांग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा यासाठी दिव्यांग मतदारांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केले आहे किंवा 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार आहेत त्यांनी फॉर्म नं.6 अवश्य भरुन दयावे. फॉर्म नं.6 हा बीएलओ यांचेकडे उपलब्ध आहे. तसेच तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा उपलब्ध करुन दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी हारेश गुप्ता, शेहबाग शेख, आकाश मेश्राम, राखी चुटे, देवेंद्र रहमतकर, इंदू बघेले, दुर्गेश जावळकर, कमलेश फुंडे, राजकुमार बावीरशेट्टी, हर्शिका उके व विजय वटचानी इत्यादी दिव्यांग मतदारांचा मान्यवरांच्या हस्ते ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य लिहिलेले बॅच व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्यासोबत मतदान प्रक्रियेविषयी संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार हरिश्चंद्र मडावी यांनी मानले. कार्यक्रमास दिव्यांग बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षरोपटे लावण्यात आले.