नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी चर्चासत्राचे आयोजन 

0
17
गोंदिया,दि.04: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्यावतीने व्याघ्रप्रकल्पाच्या वाटचालीत जनतेसह स्वंयसेवी संस्थांचा सहभाग या विषयावर एमटीडीसीच्या बोलदकसा रिसोर्ट येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्राचा मुख्य उद्देश नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वाटचालीत सर्व सहभागीदारांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे हातभार लावून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची एक टीम म्हणून एकत्रीत काम करुन व्याघ्र संवर्धनाचा आदर्श खरा ठरावा हा होता.चर्चासत्रात व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित अशासकीय संस्था,मानद वन्यजीव रक्षक,इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी,व्याघ्र प्रकल्पातील तज्ञ व्यक्ती,निसर्ग प्रेमी,निसर्ग शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी,ग्राम विकास समितीचे ग्रामस्थ (ईडीसी),निसर्ग मार्गदर्शक,जिप्सी चालक,रिर्साट मालक,महाविद्यालय प्राध्यापक व अधिकारी/कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.या चर्चासत्रात सहभागी झालेल्या प्रतिनिधीकडून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक सुचना प्राप्त झाल्या. त्यांचा वन्यजीव व्यवस्थापन व कायदेशीर दृष्टीने योग्य अभ्यास करुन व्याघ्र प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी उपयोग करण्यात येणार आहे.यावेळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया या बफर क्षेत्रात व कॉरीडोर क्षेत्रात काम करणाèया अशासकीय सदस्यांनी (एनजीओ) त्यांनी केलेल्या व चालू असलेल्या विकास कामांबाबत सादरीकरण केले.
चर्चासत्राला उद्घाटक म्हणून नागपूरचे पक्षीतज्ञ गोपाल ठोसर होते.अध्यक्षस्थानी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम.रामनुजम हे होते. तसेच मुख्य अतिथी म्हणून सेवानिवृत्त वनसरंक्षक एस.एल. ठवरे,उपवनसरंक्षक एस. युवराज,वन्यजीव रक्षक दिलीप गोडे, मुकुंद धुर्वे,उपसंचालक अमलेंदू पाठक उपस्थित होते.
प्रास्ताविकात क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम यांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील विकास कार्याचा उद्देश विषद केला व भविष्यात वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाकरीता सहभागीदारांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे सांगितले.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला सन २०२० पर्यंत भारतातील व्याघ्र प्रकल्पामध्ये नंबर १ वर नेण्याकरिता आपण एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. पक्षी तज्ञ गोपाल ठोसर यांनी वनाचे महत्व व निसर्ग संरक्षणाचा वारसा नव्या पिढीला जपणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. एस. युवराज यांनी बफर व कॉरीडोर क्षेत्रातील वन्यप्राण्याच्या व त्यांच्या अधिवासाचे संवर्धनात योगदान देण्याबाबत सर्वांना आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार यु.एस. सावंत यांनी केले.