राज्यातील मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचा टक्का वाढवणार : ना.सुधीर मुनगंटीवार

0
8

* चंद्रपूर मध्ये मिशन सेवा अभियानाची सुरुवात*
* ऑन लाईन अर्जाद्वारे टेस्ट सिरीज घेणार*
* दर रविवारी तज्ज्ञाचे मार्गदर्शनाची मोहीम*
* दोन दिवसांच्या युवा मेळाव्याचे आयोजन करणार*

चंद्रपूर, दि.15: चंद्रपूर जिल्हयात व राज्यात सामूहिक सहभागाचे जनताभिमुख उपक्रम राबवणारे वित्त,नियोजन व वने मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मिशन सेवा या अभिनव प्रयोगाची सुरुवात चंद्रपूरमध्ये केली. केंद्रीय व राज्य सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांचा टक्का वाढावा यासाठी या आगळ्या – वेगळ्या मिशन सेवा उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात 14 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यामध्ये मिशन सेवा अभियानातील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. मिशन सेवा अंतर्गत या आधी चंद्रपूर येथील प्रस्थत अशा बाबा आमटे अभ्याशिकेस ‘मिशन सेवा एडिशन’ या  विशेष प्रकारच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते.

मिशन सेवांतर्गत राज्य शासनामार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच आवश्यक अभ्यास साहित्याचे वाटपही या योजनेमध्ये केले जाणार आहे. तथापि, या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या युवकांना एमपीएसी पूर्व परिक्षेचे सराव परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी chanda.nic.in या संकेत स्थळावर भेट देणे आवश्यक आहे. याशिवाय हॅलो चांदा या मोबाईलॲप वर देखील याबाबत लिंक देण्यात आली आहे. या सराव परीक्षा सत्रातील पहिली परीक्षा ही 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात येईल. सदर परीक्षेचे प्रश्न संच हे पुणे येथील नामवंत संस्थेमार्फत तयार करण्यात आले असून हे सत्र विद्यार्थ्यांकरिता पूर्णपणे विनामूल्य राहील. अश्या प्रकारच्या सत्राचे आयोजन पुढे ही प्रत्येक रविवारी करण्यात येईल. परीक्षा संपल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिकाचे उत्तरांच्या अनुषंगाने विडिओ च्या साहाय्याने तज्ज्ञांकडून विश्लेषण करण्यात येईल. या संबंधित भविष्यातील पुढील माहिती करीता इच्छुक विद्यार्थ्यांनी chanda.nic.in या संकेतस्थळास वारंवार भेट द्यावी.

आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मेगा भरती मध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन सेवा अंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि परीक्षा घेण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी यासंदर्भात सराव परीक्षेचे देखील आयोजन करण्यात आले. निवडक मुलांना या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यातून तयार केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनात नव्याने लागलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठीक ठिकाणी मुलांना दिले जाणार आहे.याशिवाय आज पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या संस्थांना व मान्यवरांना देखील पाचारण करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये चंद्रपूर येथे परीक्षेस पात्र असणाऱ्या मुलांना तज्ञ तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी युवकांचा मेळावा घेण्याचेही संकेत आज मुनगंटीवार यांनी दिले.

स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील तरुण पिढी घडविली आहे. अशा प्रख्यात, नामवंत मार्गदर्शकांना यासाठी चंद्रपूरमध्ये पाचारण करण्यात येणार आहे.  युवकांच्या मेळाव्यात आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रांमध्ये परीक्षेला सामोरे जाण्याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरला झालेल्या या बैठकीमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ करण्यात  आला. यावेळी पहिले रजिस्ट्रेशन करणाऱ्या युवकाला लोकराज्यचा अंक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

आजच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, जिल्हा समन्वयक सुनील धोंगडेयांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पालकमंत्री इंटर्न म्हणून मिशन सेवा करिता रुजू झालेल्या स्नेहा मेघावत यांनी केले..