केळवदच्या जंगलात बिबट्याची गोळय़ा झाडून शिकार

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.१७.:तालुक्यातील केळवद/केशोरी वनक्षेत्र कक्ष क्र.२३३ मध्ये बिबट्याची गोळय़ा झाडून शिकार करण्यात आली. ही घटना (दि.१५) दुपारी ४ वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली असून शिकार केलेल्या बिबट्याचे चारही पाय गायब आहेत. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका हा वनसंपदेने नटलेला आहे. या तालुक्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प असून मोठय़ा प्रमाणात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार पहावयास मिळते. विविध प्रकारचे पशु, पक्षी येथे आढळत असल्याने पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे. विविध प्रकारच्या प्रजातीचे पशु-पक्षी असल्याने या क्षेत्रावर शिकारींचा डोळा असतो. केशोरी वनक्षेत्रातील कक्ष क्र.२३३ मध्ये केळवदच्या शिवारात रस्त्याच्या बाजुला (दि.१५) दुपारी ४ वाजता सुमारास बिबट मृतावस्थेत आढळून आला. गावकर्‍यांची याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून मृत बिबट्याला गोठणगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात घेवून गेले. शिकार करण्यात आलेल्या बिबट्याचे चारही पंजे गायब असल्याने त्यांची शिकार करून रस्त्याच्या बाजुला विल्हेवाट लावली गेली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. दरम्यान रविवार (दि.१६) बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यात गोळय़ा झाडून शिकार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शिकार करणात आलेला बिबट हा २ ते ३ वर्षाचा होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वनविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेतील आरोपी मोकाटच असून वनविभागाचे अधिकारी त्या दिशेने तपास करीत आहेत.