अल्पसंख्यक समुदायांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार-हाजी अराफत शेख

0
23

गोंदिया,दि.21ः- केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या संदर्भातील 15 कलमी कार्यक्रमांतर्गंत असणाऱ्या सर्व योजना गोंदिया जिल्ह्यातील अल्पसंख्याक लागू करुन समुदायाचे प्रलबिंत प्रश्न व प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील.तसेच जिल्ह्यात मौलाना अब्दुल आझाद महामंडळाचे कार्यालय सुरु करुन अधिकारी नेमण्यासाठीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा अल्पसंख्यांक आयोग करेल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी आज शुक्रवारला पत्रपरिषदेत दिले.

ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक समाजातील विविध योजनासंह निधीचा आढावा घेण्यासाठी आले असता पत्रकारपरिषदेत बोलत होते.पत्रपरिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे,मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी यांच्यासह अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा जिल्ह्यातील पहिला दौरा होता. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना आपण भेट देत असून त्या ठिकाणच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या समस्या जाणून घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या राज्यस्तरीय दौºयातंर्गत जिल्हयाची भेट असून संपूर्ण ३६ जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत.
आज सकाळी त्यांनी जिल्ह्यातील जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन व मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाच्या विविध मंडळांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात सुरू असलेली अंमलबजावणी संदर्भात त्यांनी विभागप्रमुखांची चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, याबाबतची सूचना केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुस्लीम, जैन, शीख, बौद्ध, खिश्चन आदी अल्पसंख्याक समुदायासाठी काम करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे तसेच झालेल्या काही महिन्यातील कामाची माहिती दिली.गोंदिया शहरामधील मुस्लीम समुदायाच्या कब्रस्तानाचा प्रश्न निकाली लावण्याचे निर्देश देण्यात आले असून जैनमुनी जेव्हा केव्हा ते मुख्य मार्गाने प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करण्यासंबधीची सुचना पोलीस विभागाला करण्यात आल्याची माहिती दिली.राज्यातील प्रत्येक जिल्हयात अल्पसंख्याक विद्यार्थ्यासांठी वसतीगृहाची सोय आहे,परंतु याठिकाणी अद्यापही हे सुरु झालेले नसल्याने वसतीगृहाचा प्रस्ताव तत्काळ देण्यासंबधी सुचना करण्यात आल्या असून मुलींच्या वसतीगृहाकरीता प्रस्ताव आल्याचेही सांगितले.सोबतच पोलीस,तलाठीसह इतर पदाच्या भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी दोन संस्थाचे प्रस्ताव आल्याची माहितीही दिली.
बैठकीमध्ये त्यांनी महिला व बालकल्याण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रशिक्षण विभाग, नरेगा, नागरी उपजीविका अभियान, कौशल्य विकास विभाग, मुद्रा बँकमधील अल्पसंख्यांकांचा सहभाग, प्रधानमंत्री आवास योजना अल्पसंख्यांकबहुल वस्तीमधील सुधारणा, आदींसंदर्भात धावता आढावा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी आदींशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.यावेळी जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रकल्प मंत्रालयात प्रलंबित असल्याचे अधिकाºयांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा केला जाईल व तातडीने जिल्ह्यामध्ये हे सर्व प्रकल्प सुरू होतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.