जीवनात पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण-डॉ.कादंबरी बलकवडे

0
149

गोंदिया ग्रंथोत्सव-२०१८ चे उदघाटन
गोंदिया, दि.२७: वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. अवांतर पुस्तके वाचनामुळे विचारसरणी प्रगल्भ होत असते. ग्रंथ हे आपले मित्र आहे. अनेक ग्रंथ हे आपल्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे जीवनात पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सभागृहात २७ डिसेंबर रोजी आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-२०१८ चे उद्घाटन करतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सहायक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे, कवी कथाकार व चित्रकार प्रमोद अनेराव यांची उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, नव्या पिढीने पुस्तकांचे अवांतर वाचन केले पाहिजे. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते. जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि वाचनामुळेच ध्येय गाठता येते. गाव तिथे ग्रंथालय झाले पाहिजे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अशाप्रकारच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन ग्रामीण भागात सुध्दा करण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रमोद अनेराव म्हणाले, भाषा हे संवादाचे साधन आहे. मराठी भाषेचे वैभव जपले पाहिजे. मराठी साहित्य समृध्द आहे, या साहित्याचे वाचन झाले पाहिजे. समाजात असलेले वेगवेगळे विचारप्रवाह हे समाज सुधारणेसाठी एकत्र आले पाहिजे. ग्रंथाचे भांडार हे वैभव आहे. या वैभवापासून कोणीही वंचित नसावे. थोरामोठ्यांचे विचार ग्रंथातून लोकांपर्यंत गेले पाहिजे, त्यासाठी ग्रंथाचे सर्वांनी नियमीत वाचन करावे असे त्यांनी सांगितले.
मिनाक्षी कांबळे म्हणाल्या, या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचनाची गरज असते. ग्रंथ वाचनामुळे माणसाचे व्यक्तीमत्व घडते. वाचन चळवळ वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमांचा वाचकांनी अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
सकाळी १० वाजता गोंदिया येथील जयस्तंभ चौकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून ग्रंथदिंडीने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, प्रा.बबन मेश्राम,  हिदायत शेख, ॲड.योगेश अग्रवाल, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य सुरेश गिऱ्हेपुंजे, डी.डी.रहांगडाले, यशवंत चौरागडे, डॉ.श्रावण उके, रवि नाहाटे, अंकुश कटरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार विभागाच्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन केले. कार्यक्रमाला माणिक गेडाम, युवराज गंगाराम, मिलिंद रंगारी, एन.एम.डी.कॉलेजचे प्रा.बबन मेश्राम, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा.कविता राजाभोज,  जयंत शुक्ला, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी केले. संचालन तोषिका पटले यांनी केले, उपस्थितांचे आभार नेपाल पटले यांनी मानले.